बुलडाणा - दुसऱ्या टप्यातील मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज (शनिवारी) 24 ऑगस्ट रोजी मलकापूर येथे पोहचणार असल्याने यात्रा शहरातून जाणार म्हणून शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आणि नंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहराबाहेर गेली तेव्हा काही तासांनंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरातील नागरिकांना भाजपच्या महाजनादेश यात्रा डोकेदुखी म्हणून ठरली. या वीज बंदचा पाच ते सात तास नाहक त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागला. यानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच यावेळी जेटली यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून धुळे नंदूरबारपासून सुरु झाला. यात्रा आज शनिवारी जळगावच्या जामनेर येथून दुपारी बारा वाजता मलकापूरमध्ये येणार होती. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रामध्ये अभिवादन करताना तेव्हा अचानक विजेच्या तारांचा स्पर्श होणार होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतर्कता दाखवत दोघे खाली वाकल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आज (शनिवारी) मलकापूर शहरातील ज्या ठिकाणाहून ही यात्रा जाणार होती त्या परिसरातील 5 किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील सर्व विजेचे तार मलकापूर वीज वितरण महामंडळाने सकाळी पासूनच काढून तेथील वीज खंडीत केली होती. यामुळे मलकापूर वासियांना खंडित विजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी शहरातील ऍड.अनंतकुमार शर्मा यांनी वीज वितरण महामंडळाच्या विरोधात मलकापूर शहर पोलिसात ऑनलाइन तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दुपारी 2 वाजताच्या सुमारास दाखल झाली. मात्र, आज(शनिवारी) अरुण जेटलींचे निधन झाल्याने महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आणि केवळ अर्ध्या तासातच ही यात्रा पुढच्या सभेच्या ठिकाणी जेटलींना श्रद्धांजली वाहण्याकरिता रवाना झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदामंत्री गिरीष महाजन, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, कामगारमंत्री डॉ.संजय कुटे, विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष मलकापूरचे आ.चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. तर यात्रा पुढे गेल्यानंतर रस्त्यावरचे काढलेले विजेचे तारे जोडून दोन तासांच्या फरकाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
मात्र, एकीकडे मुख्यमंत्री महाजनादेशाच्या नावाखाली आपण केलेली कामे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांना समाधान होण्याऐवजी यात्रेत अडसर ठरणाऱ्या विजेचे तारेमुळे दोष नसताना खंडीत केलेला वीज पुरवठा तब्बल पाच ते सात तास वीज बंद करण्यात आला. याचा नाहक फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागला.