बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांची घरवापसी करण्यात येत आहे. मेहकर येथील 118 तर खामगाव येथील 44 परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रविवारी 10 मे आणि सोमवारी 11 मे ला मेहकर व खामगाव आगारातून सोडण्यात आले.
खामगावात मध्यप्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड व बिहारमधील तर मेहकरमध्ये छत्तीसगड 18, बिहार 25, मध्यप्रदेश 06, ओडिसा 22, उत्तर प्रदेश 35, झारखंड 2, पश्चिम बंगाल 2 एवढे मजूर अडकले होते. यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने खामगावातील 44 मजुरांसाठी खामगाव आगाराच्या वतीने 2 बस रवाना करण्यात आल्या. तर मेहकारच्या 118 मजुरांसाठी मेहकर आगारकडूम 6 बस पाठवण्यात आल्या.
यावेळी खामगाव उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतलकुमार रसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, नायब तहसीलदार विजय चव्हाण, खामगाव आगारप्रमुख एस. एच. पवार, स्थानक प्रमुख आर. यु. पवार तर मेहकर येथे आगारामध्ये डेपो मॅनेजर रणवीर कोळपे, स्थानक प्रमुख हरीश नागरे सहाय्यक वाहतूक निरीक्षक समाधान सोनुने, समाधान जुमडे, आर. आर. जोशी, आत्माराम चोत्मल, बी. के. जाधव, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, राज्य परिवहन अधिकारी संताजी बर्गे, मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आत्माराम प्रधान उपस्थित होते.