भंडारा - सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रत्येक गोष्टीतून शिकायला मिळते. संपूर्ण देशात क्वारंटाईन केलेल्या लोकांनी मानसिक तणाव आणि नैराश्यातून क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ घातल्याचे प्रकार आपण ऐकले असेल. मात्र, लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाईन केलेल्या तरुणांनी शाळेत श्रमदान करत शाळेचे रुपडे बदलून लोकांपुढे नवीन उदाहरण ठेवले आहे.
जेवनाळा येथील अनेक लोक उदरनिर्वाहासाठी हैदराबाद व पुणे या ठिकाणी गेले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत हातचे काम गेल्याने हे सर्व मजूर आपल्या स्वगावी जेवनाळा येथे पोहोचले. गावी आल्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे घरी न पाठवता. जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. सुरुवातीला त्यांनाही क्वारंटाईन म्हणजे शिक्षा असेल असे वाटत होते. त्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन दिवस हे तरुण जेवणे आणि झोपणे एवढेच करत होते.
मात्र, टाळेबंदी सुरू झाल्यापासून शाळा बंद असल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला होता. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग कोमेजून गेल्याचे या क्वारंटाईनमध्ये असलेल्या तरुणांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वेळेचा सदुपयोग करत श्रमदान करण्याचे ठरविले. ते दररोज नियमितपणे शाळेचे परिसर स्वच्छ करणे, रोपट्याला पाणी देणे, फुलझाडांची देखरेख करणे आदी काम करत राहिले, एवढेच नाही तर त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे.
या तरुणांच्या श्रमदानामुळे शाळेचा परिसर तर स्वछ झालाच सोबत या त्यांचा शारीरिक व्यायाम झाला आणि ज्या ठिकाणी मनोरंजनाचे काहीच साधन नव्हते, तिथे त्यांचा वेळही सहज निघून गेला. तरुणांचे हे कार्य इतर क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या मानसिकतेत एक सकारात्मक बदल आणण्यासाठी आदर्श उदाहरण ठरले.
हेही वाचा - अड्याळ येथील पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण, स्थानकाला लावले कुलूप