भंडारा - जिल्ह्याच्या तुमसर शहरात पुन्हा भर दिवसा खुनाचा तांडव पाहायला मिळाला. एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सचिन मस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रेमप्रकारणातू ही हत्या झाली असून संपूर्ण हत्याकांड सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. आरोपीची ओळख पटली असून, पोलीस यंत्रणा फरार आरोपीच्या मागावर आहे. लवकरच आरोपी पकडला जाईल असे पोलिसांनी सांगितले. मागील 4 महिन्यात प्रेम प्रकरणातून भर दिवसा हत्या होण्याची ही तुमसर शहरातील दुसरी घटना आहे.
हेही वाचा - साकोली अन् लाखनी उड्डाणपूल भविष्यात 'स्टेट ऑफ आर्ट' म्हणून ओळखले जातील - केंद्रीय मंत्री गडकरी
बहिणीला घेऊन गेल्याचा राग होता मनात - सचिन हा आरोपीच्या परिवारातील मुलगी घेऊन दोन दिवसांपूर्वी पसार झाला होता. त्यावेळी तुमसर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत आले होते. मात्र, सचिन हा फोन करून घरच्या लोकांना त्रास देत असल्याने त्याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या मित्रांबरोबर सचिनच्या हत्येचा कट रचला.
हत्या सीसीटीव्ही मध्ये कैद - शुक्रवारी आरोपी ठरल्याप्रमाणे तुमसर देव्हाडी रस्त्यावर नाग मंदिर जवळील टपरीवर सचिनची वाट पाहत होता. सचिन हा दोन आरोपींना घेऊन घटनास्थळी पोहचला. सचिन पोहचताच आरोपीने गाडीत ठेवलेला धारदार शस्त्र काढला आणि सचिनला काही कळण्याच्या आत त्याच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार केले. सचिनसोबत बाईकवर बसून आलेल्या दोन आरोपींनी सुद्धा सचिनला खाली पाडत त्याच्यावर शस्त्रांनी वार केला. सचिनचा प्राण जातपर्यंत या तिघांनीही त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला आणि सचिन जेव्हा पूर्णपणे मृत्यू पावला असे लक्षात आल्यावर मुख्य आरोपीने त्याची गाडी काढली आणि उर्वरित दोन आरोपी त्याच्या गाडीवर बसून निघून गेले.
हत्येपूर्वी सचिन दोन आरोपींसह घटनास्थळी का आला? हे दोन्ही आरोपी आणि सचिन यांच्यात काय संबंध होते? आरोपी सचिन सोबत आले मात्र त्याचीच हत्या का करू लागले? असे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून मुख्य आरोपींची ओळख पटली असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाणार, असे पोलिसांनी सांगितले आणि त्यानंतरच या हत्याकांडातील उर्वरित प्रश्नांची उत्तरे मिळतील. चार महिने अगोदर अशाच प्रकारे तुमसर शहरात एका व्यक्तीची धारदार शस्त्राने भरदिवसा प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती. गँगवॉरमुळे हत्या होण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या तुमसर शहरात आता प्रेम प्रकरणातूनही हत्येचे प्रकरण वाढले आहे. त्यामुळे, हे रोखणे पोलिसांपुढे नवे आव्हान असणार आहे.