भंडारा - बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील येरली गावात घडली आहे. विनोद कुंभरे या ( वय २६ ) असे त्या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी त्याचा विवाहसोहळा संपन्न होणार होता. तत्पूर्वीच विनोदची हत्या करण्यात आली आहे. मात्र, ही हत्या कोणी आणि का केली याची माहिती अद्याप मिळाली नाही.
कुंभरे यांच्या घरी ७ मे ला दोन मुलांचे लग्न आयोजित करण्यात आले होते. लग्न असल्यामुळे दारात मांडव घातला आहे. तसेच हळदही आज लावली जाणार होती. यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक घरी आले आहेत. मात्र, लग्नाच्या आधीच विनोदची ह्त्या करण्यात आल्याने गावात खळबळ उ़डाली आहे.
येरली गावातील विनोद कुंभरे हा चंद्रपूर जिल्ह्यात एका खासगी कंपनीत कामावर आहे. उद्या होणाऱ्या लग्नासाठी तो सुट्ट्यांवर गावी आला होता. काल (रविवार) संध्याकाळी विनोद काही कामानिमित्त घराबाहेर गेला तो परातलाच नाही. आज सकाळी गावाशेजारील शेतात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या पोटावर एक मोठा चाकूचा वार होता आणि शरीराजवळ एक चाकू पडलेला आढळून आला. तर शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यामुळे त्याची चाकूने हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, चाकूवर रक्ताचे डाग दिसत नसल्याने हत्येचे ठिकाण दुसरे असावे असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येचा योग्य तपास करावा, अशी मागणी आदिवासी समाजातर्फे करण्यात आली आहे.
आदिवासी कुटुंबातील विनोद याच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तीन भाऊ आणि बहीण असे त्यांचे कुटुंब आहे. मोलमजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या विनोदचा लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या का करण्यात आली याचा तपास पोलीस घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विनोदचा मृतदेह शवविच्छेदनसाठी नेण्यात आला आहे.
सध्या घरच्यांनी कोणावरही संशय घेतला नाही. त्यामुळे हत्येचे नेमके कारण काय असेल हे शोधणे पोलिसांसाठी अजूनच कठीण होत आहे. मात्र, लवकरच आरोपो शोधून काढू असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.