भंडारा - जिल्ह्यात धान खरेदी केंद्राची माहिती घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संबधित प्रक्रियेचे ज्ञान मिळावे, यासाठी एकदिवसीय कार्यशाळा ठेवण्यात आली होती. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे व्यवहार पारदर्शक व्हावेत, यासाठी आता संपूर्ण व्यवहार ऑनलाइन होणार आहेत. शासनाने या प्रक्रियेकरिता नवीन अटी घातल्या असून शेतकऱ्यांना आपली जात, जन्म तारीख आणि पॅनकार्ड यांचे दाखले दाखवावे लागत आहेत. मात्र या सर्व अटी शेतकऱ्यांना आणि खरेदी केंद्रासाठी जाचक ठरत असून यावर्षी पासून खरेदीच्या ७ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देने बंधनकारक झाले आहे.
हेही वाचा - आईचा मृत्यू झाला तरी 'त्याने' मैदान सोडलं नाही, १६ वर्षीय जिगरबाज गोलंदाजाची कहाणी
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र ही ऑनलाइन प्रक्रिया नवीन असल्याने खरेदी-विक्री संस्थांसाठी गुरुवारी एक दिवसीय कार्यशाळा ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्याअगोदर त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या जातीसाठी केवळ चार वर्गवाऱ्या दिल्या आहेत. त्यामध्ये आपले नाव कोणत्या वर्गवारीत घालावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बहुतांशी वृद्ध शेतकऱ्यांकडे जन्माचे दाखले नसतात. शिवाय, आधार कार्डही बनवलेले नसते. शेतकऱ्यांना जिथे दोन वेळच्या जेवणाची सोय नाही तिथे त्यांना पॅनकार्ड मागितले जात आहे. या वर्षी हे पॅनकार्ड अनिवार्य नसले तरी पुढच्या वर्षी ते अनिवार्य होऊ शकते. शेतकऱ्यांना धान खरेदीचे ऑनलाईन बिल शक्य नसल्याचे खरेदी केंद्रातील सभासद सांगत आहेत.
यावर्षी १ नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू केले गेले आहे. मात्र ऑनलाईनचे नियम हे शुक्रवारपासून लावले गेले आहेत. खरेदी संघाला अद्ययावत राहण्यास शासन सांगत असले तरी स्वतः शासनाची तयारी झालेली नाही. शिवाय, मागील ४ वर्षांपासून खरेदी केंद्राच्या कमिशनचे आणि गोदामाचे पैसे मिळाले नसल्याने या प्रक्रियेमुळे आमच्या अडचणीत अधिकच वाढ होणार असल्याचे खरेदी केंद्राच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.