भंडारा - वेल्डिंग हा तसा पुरुषांचे वर्चस्व असणारा व्यवसाय आहे. मात्र, याला तडा दिला आहे, जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोमला अरोरा या महिलेने. कोणतेही कौशल्याचे शिक्षण न घेता केवळ जिद्दीच्या जोरावर कोमल यांनी 'गणराया फॅब्रिकेशन' या व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक कोट्यवधींची उलाढाल केली आहे.
कोमल अरोरा असे या महिलेचे नाव आहे. नाव जरी कोमल असले तरी त्यांनी निवडलेले कार्य अवघड आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील विरली गावात 'गणराया फॅब्रिकेशन' या व्यवसायाच्या त्या मालकीन आहेत. वेल्डींगच्या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व जास्त आहे. मात्र, कोमल यांनी हा व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे.
कोमल यांनी कुठलेही व्यवसायीक शिक्षण घेतलेले नाही. लग्नानंतर आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने आसगावतील एका फॅब्रिकेशन कारखान्यात लेखापरीक्षकाचे काम सुरू केले होते. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा असल्याने फावल्या वेळेत त्यांनी वेल्डिंगचे काम शिकण्यास सुरुवात केली. लेखापरीक्षक म्हणून मिळणारे तीन हजार रुपये कुटुंब चालविण्यासाठी अपुरे पडत होते. त्यामुळे त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्याच कारखान्यातील दोन सहकाऱ्यांना हाताशी घेऊन प्रायोगिक तत्वावर पहिली ट्रॉली बनविली आणि तिच्या विक्रीनंतर या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्याचे ठरविले.
व्यवसायाला सुरुवात...
सुरुवातीला एका राईस मिलच्या मालकांनी स्वतः ची जागा दिली. त्या जागेवर काही ट्रॉली बनवून विक्री केल्यानंतर कोमल यांनी विरली गावात भाडेतत्त्वावर जागा घेऊन ऑक्टोबर 2016 मध्ये गणराया इंजिनिअरिंग या नावाने कारखाना सुरू केला. यासाठी एका सहकारी मुलाच्या वडिलांकडून 1 लाख रुपये उसने घेतले आणि कार्याला सुरुवात झाली. ग्राहकांशी संवाद साधणे प्रत्येक कामगारांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यानंतरच स्वतः वेल्डिंगचे काम असो किंवा इतर सर्व कामं त्या अगदी सहजपणे हाताळतात.
आतापर्यंत कोमल यांनी 150पेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रॉली बनवून विक्री केल्या आहेत. येणाऱ्या काळात संपूर्ण विदर्भामध्ये गणराया इंजीनियरिंगचे नाव व्हावे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. कोणतेही काम कठीण नसते तसेच त्यावर कोणा एकाची मक्तेदारीही नसते. त्यामुळे मनात न्यूनगंड न ठेवता एखाद्या कामाची आवड निर्माण झाल्यास त्याला व्यवसायाच्या दृष्टीकोनातून बघून तसा प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष : संसाराचा गाडा हाकण्यासाठी 'तिने' हातात घेतले रिक्षाचे 'स्टेअरिंग'