भंडारा - शहरात नगर पालिका आणि अबकारी विभाग यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शहरात दारू अत्यावश्यक सेवा तर किराणा अत्यावश्यक सेवेच्या बाहेर आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण व्यापारपेठ बंद असताना दारू दुकाने सुरू होते. या प्रकारावर शहरातील नागरिकांनी आक्षेप व्यक्त केला.
या अगोदर भंडारा शहरात व्यापरपेठे बंद ठेवण्याचा दिवस हा मंगळवार असायचा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा मुख्याधिकारी यांनी मंगळवार ऐवजी रविवारी व्यापारपेठ बंद ठेवण्याचे आदेश काढले. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा यामध्ये दवाखाने, औषधालय, भाजीपाला आणि दुग्ध डेअरी सुरू राहील. उर्वरित सर्व दुकाने बंद राहतील, असे या आदेशात नमूद केले.
23 ऑगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आणि व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या निर्णयाचे पालन करत भंडारा शहरातील सर्व बाजारपेठा रविवारी बंद ठेवल्या. यामध्ये किराणा दुकान, बेकरी, दुग्धजन्य पदार्थांची दुकाने, स्वीटमार्ट सर्वच बंद ठेवण्यात आले. एकीकडे किराणा आणि दुग्धजन्य पदार्थ सारख्या वस्तू बंद ठेवण्यात आल्या मात्र दुसरीकडे शहरातील दारू दुकाने सुरू होती त्यामुळे नागरिकांनी या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करत किराणा, दही, पनीर यापेक्षा ही दारू महत्वाची का असे प्रश्न निर्माण केले आहेत. घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला गेला.
सर्व दुकाने बंद असताना दारूची दुकाने का सुरू आहेत, असे मुख्याधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की दारूच्या दुकानांवर आमचे नियंत्रण नसते, ती बंद किंवा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग देऊ शकतो. आम्ही आमच्या अधिकार क्षेत्रात येणारी दुकाने बंद ठेवली आहेत.
या विषयी राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की दारू दुकाने आठवड्यातून एक दिवस बंद ठेवावी असा कोणताही नियम नाही. फक्त ड्राय डेला ही दुकान बंद ठेवायची असतात. त्यामुळे शहरातील इतर दुकाने बंद असूनही दारू दुकाने सुरू आहेत.
दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलेले नियम ग्राह्य धरले तरी कोरोनाच्या संककाळी नियम हे सर्वांना सारखे असावे, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रविवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी रविवार दिवस आठवड्यातील बंदचा दिवस म्हणून ठरविला आहे. व्यापरपेठे बंद राहिल्यास नागरिक कमी प्रमाणात घराबाहेर निघतील असा उद्देश प्रशासनाचा होता. मात्र, दारू दुकाने सुरू असल्याने या उद्देशाला गाठणे शक्य होईल का? नागरिक दारू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर निघतील. त्यामुळे बंद हे 100 टक्के असल्यास उद्देश प्राप्ती नक्की होईल मात्र, यासाठी या दोन्ही विभागात समन्वय असावा मात्र तो आज तरी दिसला नाही आणि त्यामुळे किराणा पेक्षा दारू महत्वाची झाली असल्याची चर्चाा शहरात सुरू आहे.