भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्ष यांना पत्र लिहून बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्वतःचे प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी नाना पटोले दिल्लीला जात असल्याची चर्चा सुरु आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी, उद्या दिल्लीला नाही तर, पुण्याला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. माझे पूर्ण लक्ष पुण्यातील निवडणुकीवर आहे. त्यामुळे दिल्लीला जाण्याचा प्रश्नच नाही असे, देखील नाना पटोले म्हणाले. ते आज भंडारा येथे पत्रकांराशी संवाद साधत होते.
तांबेच्या राजकारणाकडे लक्ष नाही : काँग्रेसमध्ये बंडखोरीमुळे गृह युद्ध बघायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांच्याविषयी नाना पटोले यांना विचारले तर ते म्हणाले या प्रकारच्या राजकारणाकडे मी लक्ष देत नाही. कोणी काय बोलावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आज काँग्रेस महाराष्ट्रात अदानी विरुद्ध लढते आहे. त्यावर जास्त आमचे लक्ष आहे. आम्ही लोकांच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नाविषयी, रोजगार प्रश्नावर लढा उभारला आहे. त्यामुळे कोण काय राजकारण करते याकडे मी फारसे लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
कसब्यात बंडखोरी : कसब्यामध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चा आहे, याविषयी नाना पटोले यांना विचारले असता ह्या सर्व माध्यमांच्या बातम्या आहेत. शिक्षक मतदार संघातही अशाच बातम्या आल्या होत्या. मात्र, आम्ही जिंकलो, महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीविरुद्ध बातम्याने काही फरक पडणार नाही. अजुन विड्रॉलला वेळ आहे. कसबा हा संताचा, क्रांतिकारी विरांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता समाज विरोधी भाजपा सरकारला हरविण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती बनवली असून कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसची विदर्भात गटबाजी : आम्हाला विदर्भाच्या गटबाजीवर लक्ष द्याचे नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली त्यांचे काम लोकांपर्यंत पोहचवणे हे आमचे काम आहे. लोकांचे दुःख दूर करण्याचे काम आम्ही करत आहोत. येत्या 15 तारखेला आमची बैठक आहे. त्यामध्ये सगळे प्रश्न घेतले जातील. मला राजकारणावर बोलयाचे नाही. काँग्रेसपुढे जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. भाजप केवळ राजकारण करते आहे. बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी अशा पद्धतीच्या वावळा उठवण्याचे काम भाजपातर्फे होत आहे. त्यामुळे अशा राजकीय गोष्टींकडे सध्या आम्ही दुर्लक्ष करीत असल्याचे पटोले म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव नाही : भाजपला जनतेला बर्बाद करायचे आहे. त्यामुळे ते काही बोलू शकतात. त्यांचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. वंचित बहूजन आघाडीबाबत त्यांना विचारले असता प्रकाश आंबेडकर यांचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. यासंदर्भात माध्यमातून केवळ बातम्या येत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला आल्यास त्यानंतर त्यावर भाष्य करू असे नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - Rahul Gandhi : अग्निवीर योजना आरएसएसकडून आली; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात