भंडारा - पंधरा वर्षापासून वेगळे राहत असलेल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी येताच पतीनेही प्राण सोडला. जीवंतपणी वेगळे झालेल्या दोघांनाही मृत्यूने एकत्रित आणले. तुमसर तालुक्यातील चांदपूर गावात दोघांचीही एकत्रित अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि गावकारीही गहिवरले होते.
हेही वाचा- नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात 190 रुग्णांना डेंग्यूची लागण, 11 महिन्यात चार संशयित रुग्णांचा मृत्यू
तुमसर तालुक्यातील चांदपूर गावातील शंकर तुमसरे (वय47 वर्ष) आणि लच्छुबाई तुमसरे (वय40) वर्ष यांचे पंचवीस वर्षा अगोदर लग्न झाले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. नंतरच्या काळात त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे लच्छुबाई माहेरी निघून गेल्या. मागील पंधरा वर्षापासून त्या माहेरीच राहायच्या. शंकर तुमसरे हे पत्नीला आणि मुलांना भेटण्यासाठी जात होते. त्यांनी लच्छुबाईला घरी आणण्यासाठी बरेच प्रयत्नही केले. मात्र, लच्छुबाई यांनी माहेरीच राहणे पसंत केले.
बुधवारी सकाळी लच्छुबाईच्या मृत्यूची बातमी शंकर तुमसरे यांना मिळाली. त्यांना या बातमीचा मोठा धक्का बसला. त्यात शंकर यांनी प्राण सोडला. गावकऱ्यांनी दोघांची अंत्ययात्रा एकत्रित काढण्याचे ठरविले. लच्छुबाईला 15 वर्षानंतर पुन्हा सासरी आणल्या गेले आणि या दोघांचीही सामूहिक अंत्ययात्रा काढण्यात आली.