भंडारा : भाजपने मागील 9 वर्षात लोकाभिमुख काय काम केले आहेत. त्या कामांचा लेखाजोखा जनतेला सांगण्यासाठी शुक्रवारी भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा घेण्यात आली. यावेळी सभेला संबोधित करताना गडकरींनी काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपच्या महा जनसंपर्क यात्रेतून भाजपने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहेत. भंडारा येथील सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस सत्तेवर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मागील 60 वर्षात काँग्रेसने जेवढी कामे केली त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही 9 वर्षात केल्याचे गडकरी या सभेत म्हणाले. आज बरेच वर्षांनी मी चारचाकीने साकोलीला आलो, रोड वाहतुकीने आल्याने लाखनी आणि साकोली येथील देशातील उत्कृष्ट उड्डाण पूल पाहून मनाला समाधान मिळाले. सध्या आम्ही अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या मधील 15 वर्ष सोडले तर उर्वरित वर्ष काँग्रेसचे सरकार देशात होते. या गरीबी हटावचा नारा दिला. मात्र केवळ बोगस कामे करून भ्रष्टाचार केल्याचे गडकरी म्हणाले.
यशाचे रहस्य : मला अमेरिकेत एका कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आले, तेव्हा मला कळले की भारतापेक्षा अमेरिकेत मला ऐकले जाते. त्यांनी मला विचारले की तुमच्या यशाच्या मागचे रहस्य काय, तेव्हा मी त्यांना सांगितले की, लहानपणापासून मी आरएसएस, विद्यार्थी परिषद आणि भाजपामध्ये कार्य केले. तिथून मिळालेले अनुभव आणि संस्कारामुळे मी हे सर्व कार्य करू शकतो. भंडारामध्ये दूध प्रकल्प आणले, सिंचनाच्या सोयी केल्या. भंडारामध्ये 75 टक्के लोकांना सिंचनाची व्यवस्था व्हावी, ही माझी इच्छा आहे. या देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा देश बनवायचे आहे. 2024 मध्ये उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. भ्रष्टाचार मुक्त काम मी आजपर्यंत केले आहे, कारण आम्हाला तसे संस्कार मिळाले. भविष्यात पेट्रोल डिझेल हद्दपार करून तनसापासून इथेनॉल तयार करून शेतकऱ्याला फक्त अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता बनवायचे आहे. तनासापासून डांबर तयार करणार असल्याचे प्रोजेक्ट लवकर सुरू करू म्हणून त्यांनी यावेळी पुन्हा सांगितले.
वाचला कामांचा पाढा : आयुष्मान भारत, पंतप्रधान उज्वला गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना, अशा एकूण 32 योजना राबवण्यात येत आहेत. या योजना निर्माण करून देशाचे भविष्य निर्माण करण्याचे कार्य मोदी सरकार करत आहे. प्रत्येकाला शिक्षण, ग्रामीण भागात मजबूत रस्ते, प्यायला स्वच्छ पाणी, 24 तास विद्युत, उपचारासाठी रुग्णालय निर्माण केले. मागील 60 काँग्रेसने जेवढी कामे केली त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही 9 वर्षात केल्याचे त्यांनी सांगितले. विवेकानंद यांनी 21 वे शतक हे भारताचे असेल अशी भविष्यवाणी केली. त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजप मोदींच्या नेतृत्वात 24 तास कार्य करीत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बावनकुळेंची काँग्रेसवर टीका : या कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रस्ताविक भाषण खासदार सुनील मेंढे यांनी केले तर अध्यक्षीय भाषण चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मतांचे कर्ज हे कार्य पूर्ण करून फेडावे, जे मोदीच्या नेतृत्वात भाजपने केले आहे. 288 मतदार संघात कामाची माहिती पोहचवायची आहे, असे सांगत बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून आणताच त्यांनी सावरकर यांना अभ्यासक्रमातून हटवले, धर्मांतर कायदा रद्द केला हे आम्हाला मान्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
नेत्यांची उपस्थिती : यावेळी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा - गोंदियाचे खासदार सुनील मेंढे, विधानसभा आमदार परिणय फुके, तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर माजी आमदार दिवंगत रामचंद्र अवसरे यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा -