भंडारा - जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींच्या सदस्य निवडीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते. आज जिल्ह्यातील सातही तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाल मतपत्रिका मोजण्यात आल्यानंतर सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली.
तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी सुरू -
भंडारा जिल्ह्यात सातही तालुक्यामध्ये ही मतमोजणी सुरू आहे. तुमसर तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मोहाडी व भंडारा तहसील कार्यालयामध्ये ही मतमोजणी सुरू आहे. पवनी तालुक्यामध्ये नगरपरिषद विद्यालयात तथा कनिष्ठ विद्यालयामध्ये मतमोजणी सुरू आहे. लाखनी तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये मतमोजणी सुरू आहे. तर साकोली तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी सुरू असून लाखांदूर तालुक्यातील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे मतमोजणी सुरू आहे.
पोलिसांची बंदोबस्त -
मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार होती. मात्र, सुरुवातीला टपाली मतमोजणीला सुरुवात झाल्याने प्रत्यक्ष मतमोजणी 10.30 नंतर सुरू झाली. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये साठ टेबलवर ही मतमोजणी पार पडत आहे. यासाठी 66 सुपरवायझर, 132 मतमोजणी सहाय्यक, 66 शिपाई असे एकूण 240 कर्मचारी जबाबदारी पार पाडत आहेत. मतदान केंद्रांवर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मतदान केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.