भंडारा - रक्षाबंधन सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, भंडारा जिल्ह्यातील चांभार आणि काहर समाज हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करतात. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या दिमाखात शोभायात्रा काढून सण साजरा केला जातो. शुक्रवारी या दोन्ही समाजातर्फे मोठी शोभायात्रा काढून आनंदाने सण साजरा करण्यात आला.
प्रत्येक समाजाच्या काही वेगळ्या चालीरीती आणि परंपरा असतात. अशीच एक वेगळी परंपरा चांभार आणि काहर समाजात आहे. कित्येक वर्षांपासून ते परंपरा जपत आले आहेत. राखीच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही समाजात राखीचा सण साजरा केला जातो. सणानिमीत्त प्रत्येक घरी वेगवेळे पदार्थ बनवले जातात.
सणाचे वेगळेपण -
ज्या घरामध्ये नविन लग्न झालेले असते, त्या घरातील महिला आपल्या डोक्यावर गव्हाच्या पीकाची छोटी कुंडी ज्याला भंडाऱ्यात 'भुजली' म्हणतात. ही कुंडी घेऊन समाजातील सर्व महिला आणि पुरुष एकत्र येतात. त्यानंतर गव्हाची कुंडी पुजेसाठी तलावात नेतात व नंतर ती एकमेकांना देऊन सणाच्या शुभेच्छा देतात.
परंपरेला आता आधुनिक गोष्टींची जोड मिळाली आहे, अजुनही या समाजातील सर्व लोक 'भुजली' डोक्यावर घेऊन तलावावर जातात. मात्र, आता या उत्सवाला शोभायात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डीजे आणि ढोल ताश्यांच्या संगीतावर थिरकणारे तरुण-तरुणी, वेगवेगळी वेशभूषा परिधान केलेल्या अश्वांची स्वारी करणारे तरुण पाहायला मिळतात. मात्र, या आधुनिकरणात जुन्या परंपरा कायम आहेत, ही बाब समाजाच्या एकतेच्या दृष्टीने महत्वाची आहे.