भंडारा - अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तपासात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत साकोली पोलीस ठाण्यातील दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि एका जमादाराचे निलंबन करण्यात आले आहे. ही शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती. यानंतर तब्बल ३८ दिवसांनंतर तिचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणातील विद्यार्थीनीचा मृत्यू ही आत्महत्या की हत्या हे अजूनही पोलीस स्पष्ट करू शकले नाही.
14 डिसेंबर 2019 ला साकोली येथील 16 वर्षीय दहावीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. ती घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती परंतु सायंकाळी ती घरी परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतर साकोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
हेही वाचा - भंडाऱ्यात 40 दिवसांपूर्वी हरवलेल्या शाळकरी मुलीचा मृतदेह सापडला; पोलीस तपास सुरू
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पोलीस जमादार देविदास बागडे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर चार दिवसांनी या विद्यार्थिनीची सायकल साकोली येथील नर्सरीजवळ सापडली. मात्र, विद्यार्थिनीचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे हा तपास बागडे यांच्याकडून काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम बाबर यांच्याकडे देण्यात आला. तरीही मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन सामंत यांच्याकडे देण्यात आला. तरीही मुलीचा शोधण्यात पोलिसांना यश आणि नाही.
हेही वाचा - साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू
त्यानंतर 22 जानेवारीला वनविभागाच्या नर्सरीत जिथे सुरुवातीलाच सायकल सापडली होती, त्याच ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर विद्यार्थिनीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तब्बल 38 दिवसानंतर हा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ स्कूल बॅग, शाळेचा गणवेश, पुस्तक, चप्पल या वस्तू आढळल्या त्यावरून बेपत्ता विद्यार्थिनीची ओळख पटवता आली. यानंतर नागपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, अद्यापही शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे ही हत्या की आत्महत्या हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर तपासाची सूत्रे पोलीस उपाधीक्षक यांच्या हातात देण्यात आली. हा तपास सुरू असतानाच या प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईमुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यांच्या आरोपाची शहानिशा करताना या प्रकरणात आपल्या कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम बाबर, चेतन सावंत आणि जमादार देविदास बागडे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांनी दिले आहेत.