भंडारा - जिल्ह्यात रविवारी एकही रुग्ण आढळला नव्हता मात्र, सोमवारी पुन्हा 2 नवीन रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे, जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 77 वर गेली आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्यांपैकी एक भंडारा तालुका आणि एक तुमसरचा रुग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 49 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 77 एवढी झाली आहे.
सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती मुंबईवरून आल्या होत्या. तुमसर तालुक्यातील 25 वर्षीय महिला आणि भंडारा तालुक्यातील 30 वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे. यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 77 वर पोहोचली आहे. यापैकी भंडारा 11, साकोली 20, लाखांदूर 14, पवनी 14, लाखनी 11, तुमसर 5 आणि मोहाडी तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 3 हजार 562 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर, 3 हजार 384 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 101 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आज 22 जून रोजी आयसोलेशन वॉर्डमध्ये 33 रुग्ण दाखल असून आतापर्यंत 428 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 369 भरती आहेत. तर, 2 हजार 681 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाइनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 43 हजार 378 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 38 हजार 679 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 4 हजार 699 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.