तुमसर (भंडारा)- लॉकडाऊनमध्ये शिकवणी वर्ग बंद ठेवण्याच्या सूचना असताना तुमसर तालुक्यातील इंदिरानगर मध्ये करियर लॉन्चर हा शिकवणी वर्ग सुरू करण्यात आला होता. या शिकवणी वर्गाच्या मालकावर तुमसर नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढेंनी कारवाई करत 5 हजार रूपयांच्या दंड वसूल केला आणि पुन्हा शिकवणी वर्ग न उघडण्याची ताकीद दिली आहे.
संपूर्ण देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाले असून या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात यावे म्हणून शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकाराने दिले आहेत. असे असले तरी काही लोकांना कोरोना पेक्षा पैसा मोठा वाटत आहे. त्यामुळेच हे लोक शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून नियमात न बसणारी कामे करत असल्याचे चित्र आहे.
तुमसर येथील इंदिरानगरमध्ये नवीन कोर्ट इमारतीच्या मागे करियर लॉन्चर नावाचे शिकवणी वर्ग चालतो. याचा चालक या लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांना बोलावून शिकवणी वर्ग घेत असल्याची माहिती नगरपरिषदेला मिळाली. या माहितीवरून मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांनी शिकवणी वर्गावर छापा टाकत शिकवणी वर्ग चालकावर 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढेच नाही तर परत वर्ग सुरु केल्यास परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.
कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत मुलांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या शिकवणी चालकासह पालकांवर कारवाई व्हायला हवी. विनाकारण घराबाहेर पडू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवा असे आवाहन शासनातर्फे वारंवार करूनही जर पालकांना याचे गांभीर्य समजत नसेल तर अशा पालकांवर कारवाई करणे हाच एक पर्याय आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.