भंडारा- अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेच्या वतीने भंडाऱ्यात माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. परिणय फुके यांनी आरक्षणावरून धनगर आणि गोवारी समाजाचे समर्थन केल्याने, त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आल्याची माहिती आदिवासी युवा परिषदेने दिली आहे. भंडारा येथील विश्रामगृहासमोर फुके यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाली, मात्र अद्यापही आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही, शिक्षण आणि आर्थिक दृष्या समाज मागास आहे. सरकारकडून आदिवासी समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. तर दुसरीकडे आदिवासी कोठ्यातून इतर समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न होतो आहे. परिणय फुके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर आणि गोवारी समाजाचे समर्थन केले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये संताप असून, आम्ही त्यांच्या पुतळ्याचे दहन करत आहोत, अशी माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. तसेच फुके यांच्याविरोधात येणाऱ्या काळात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
परिणय फुके उपस्थित असलेल्या विश्रामगृहाबाहेर आंदोलन
परिणय फुके नागपूरवरून भंडाऱ्याला येणार असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली होती. भंडाऱ्याच्या ज्या विश्रामगृहात परिणय फुके आले होते. त्याच विश्रामगृहाबाहेर आंदोलकांनी एकत्र येत फुके यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच फुके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. मात्र या आंदोलकांना पोलिसांनी का आडवले नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.