भंडारा - सतराव्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या ११ एप्रिलला जिल्ह्यात लोकसभेची निवडणुक होणार आहे. त्यासाठी २५ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र, अर्ज भरण्याच्या एक दिवसआधीपर्यंत राजकीय पक्षांना योग्य उमेदवार मिळत नव्हता. यावरून या मतदारसंघाचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते. या निवडणुकीत भाजपकडून भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे तर राष्ट्रवादीकडून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बसपकडून डॉ. विजया नंदुरकर तर वंचित बहुजन आघाडीकडून कारूजी नान्हे यांना उमेदवारी दिली गेली आहे.
यात चारही उमेदवारांपैकी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या उमेदवारतच होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले सुनील मेंढे यांना मोठी राजकीय कारकीर्द लाभलेली नाही. सोबतच त्यांना भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील मतदार ओळखत नाहीत, अशी भाजपत चर्चा आहे. मात्र, ते संघाचे कार्यकर्ते असल्याने आणि कुणबी समाजाचे असल्याने आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याने त्यांना ही उमेदवारी दिल्या गेल्याची मतदार संघात चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे हे सुद्धा कुणबी आहेत. आणि याआधी आमदार राहीले असून काही काळ राज्यमंत्रीही राहिले आहेत.
आपण लढण्यास तयार असल्याच्या सांगत असलेले केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नंतर मात्र माघार का घेतली? असा प्रश्न सर्वांना पडला होता. या विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, २०१४ च्या पराभवानंतर पक्षाने मला राज्यसभेवर पाठविले. तेथील माझा कार्यकाळ संपायला ३ वर्ष बाकी आहे. त्यामुळे पक्षाने दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे.मात्र, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे उमेदवार असतील अशी अपेक्षा असलेल्या कार्यकर्त्यानाचा मोठा भ्रम निरास झाला. त्यामुळे पक्षातील काही कार्यकर्ते नाराज आहेत.
जातीय समीकरण
दोन्ही जिल्ह्यांच्या विचार केला तर कुणबी समाजाचे मतदार संख्या सर्वात जास्त आहे. यापाठोपाठ तेली, पवार आणि शेड्युल कास्ट मतदार आहेत. त्यामुळे भाजपकडून बहुतेकदा पवार किंवा कुणबी समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. यावर्षी तर भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी कुणबी समाजाच्या व्यक्तीला रिंगणात उतरविले आहे. शिवाय या मतदारसंघावर कुणबी आणि पवार समाजचे अधिक वर्चस्व राहले आहेत. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच नेहमी वर्चस्व राहिला आहे.
मतदारांचे प्रमुख प्रश्न -
२०१४ मध्ये स्थानिक मुद्दे हे निवडणुकीचे मुख्य मुद्दे होते. येथील मतदारांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भंडारा-गोंदिया हे तलावाचे जिल्हे म्हटले जाते. तरी सुद्धा या दोन्ही जिल्ह्यामध्ये बारमाही सिंचनाच्या सुविधा नाहीत. गोसे धरण आणखी सुद्धा अपूर्णच आहे. या प्रकल्पाची मागच्या पाच वर्षात पाहिजे तशी प्रगती झाली नाही. शेती पूरक उद्योग धंद्यांना वाव नाही. शेतमालावर प्रक्रिया करणारे कारखाने जिल्ह्यात नाही. भंडारा गोंदिया मध्ये सर्वात जास्त रोजगार हमीचे मजूर सापडतात. कारण इथे रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंदे नाहीत. २०१४ निवडणूकीच्यावेळी भाजकडून बंद पडलेले कारखाने सुरू करण्याचे सोबतच नवीन कारखाने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मागील साडेचार वर्षात असे काहीही झाले नाही. प्राथमिक आरोग्याच्या सोयी उपलब्ध नाहीत. आम्ही सत्तेत आल्यावर महागाई कमी करू रोजगार निर्मिती करून गॅस, पेट्रोलचे दर कमी करू, विजेचे दर कमी करू, शेतीमालाला योग्य हमीभाव देऊ, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे अनेक आश्वासने भाजपने २०१४च्या निवडणुकीत केल्या होत्या. देशातील दुसरे सर्वात चांगले विमानचालन प्रशिक्षण संस्था गोंदिया मध्ये आहे. मात्र, या जिल्ह्यात डोमेस्टिक विमानतळ सुरू न झाल्याने पर्यटन आणि स्थानिक लोकांचा रोजगार हिसकविला जात आहे.
या सर्व मुद्द्यांवरून लक्ष वळविण्यासाठी भाजपने २०१९च्या निवडणुकीत हे मुद्दे बाजूला सारून हिंदुत्व टिकवायचा असेल तर भाजपाला मतदान करा. देश वाचवायचा असेल तर मोदींना मत द्या, असा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप करत आहेत. भाजप सरकारच्या काळात प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, प्रधानमंत्री सडक योजना यांचा मोठा गवगवा झाला. उज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर मिळाले. मात्र त्याच्या वाढत्या दरमुळे लोकांची कोंडी होत आहे. प्रत्येकाला वीज मिळाली, मात्र वीज दरात झालेली वाढ ही सर्वसामान्याच खिसा खाली करत आहे. नोटबंदी आणि जीएसटीनंतर लहान उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहे. या सर्व मुद्द्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस कशी लोकांपुढे जाते यावर येणाऱ्या दिवसात राजकारणाची दिशा ठरणार आहे.
या निवडणुकीत युवा शिक्षित मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्याला उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोण आहे यात रस नाही तर त्याला आपल्या भागाचा विकास होणार आहे का? नेत्याचे व्हिजन काय? तो आपल्यासाठी काय करू शकतो? शिवाय शेतकरी वर्गातील मतदारांचे सिंचन वीज हे प्राथमिक प्रश्न आहेत. त्यामुळे भंडारा गोंदियातील मतदार या निवडणुकीत कोणाला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
विधानसभा मतदार संघ आणि मतदारांची संख्या -
भंडारा गोंदिया या लोकसभा मतदार संघात दोन्ही जिल्हातील सहा विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव मतदार संघ आहेत. यापैकी फक्त गोंदिया विधासभा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. उर्वरित पाचही मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील आमदार आहेत. गोंदिया भंडारा लोकसभा मतदार संघात एकूण १७ लाख ९१ हजार ६९२ मतदार आहेत. यापैकी ८ लाख ९७ हजार ४४० पुरुष मतदार आहेत तर महिला मतदारांची संख्या ८ लाख ९४ हजार २१२ एवढी आहे.
२०१४ लोकसभा निवडणूकीचा निकाल -
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपातर्फे नाना पटोले तर राष्ट्रवादीतर्फे प्रफुल पटेल हे मैदानात होते. कुणबी समाज आणि भूमिपुत्र म्हणून ओळख असलेल्या नाना पटोले यांना मोदीच्या लाटेचा फायदा मिळाला आणि त्यांनी प्रफुल पटेल यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. नाना पटोले यांना ६ लाख ६ हजार १२९ म्हणजे ५० टक्के तर प्रफुल पटेल यांना ४ लाख लाख ५६ हजार ८७५ म्हणजे ३८.१६ टक्के मत मिळाले होते.
मात्र, निवडणुकीनंतर नानांनी ३ वर्षांतच भाजप आणि मोदींवर टीकास्त्र चालवीत त्यांच्या कार्यपद्धतीचा विरोध केला. त्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपलाही राम राम ठोकला. नाना पटोले यांच्या जाण्यामुळे भंडारा-गोंदियामध्ये भाजपकडे मोठा चेहराच राहिला नाही. त्यामुळे २०१९ मध्ये त्यांना उमेदवार शोधायला १५ दिवस लागले.
२०१८ पोटनिवडणूक -
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर २०१८ मध्ये पोट निवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी माजी आमदार काँग्रेसतर्फे मधुकर कुकडे तर भाजपातर्फे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले हे रिंगणात होते. भाजपने ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा घेऊन गड राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी ५० हजार मतांनी हेमंत पाटील यांचा पराभव केला. मधुकर कुकडे यांना ४ लाख ४२ हजार २१३ तर हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ एवढी मते मिळाली होती.
उमेदवारांची राजकीय कारकीर्द -
सुनील बाबुराव मेंढे हे भंडारा नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष होण्याअगोदर मेंढे हे संघाचे कार्यकर्ते होते. ते व्यवसायानेकंत्राटदार आहेत. मात्र नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी भाजपमध्येप्रवेश केला होता. नगराध्यक्ष झाल्यानंतर केवळ सहा महिन्यानंतर त्यांचे आणि पक्षातील नगरसेवकांचे मतभेद वाढत गेले. तसेच या दोन वर्षाच्या कालावधीत शहरासाठी अपेक्षित असलेले कामे त्यांनी न केल्याने शहरातील लोकही नाराज त्यांच्यावर नाराज आहेत.अशातच त्यांना लोकसभेचीही तिकीट मिळाल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीकडून नाना जयराम पंचबुद्धे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते २००३मध्ये जिल्हा परिषदवर निवडून आले असतांना त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष बनविले होते.नाना पंचबुद्धे हे २००४ते २००९या दरम्यान भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले आहेत. २००४च्या शेवटी ६महिन्यांपूर्वी त्यांना राज्य मंत्री बनविले गेले होते, आणि त्याच ६महिन्यांसाठी गोंदिया जिल्ह्याच पालकमंत्री होते.