भंडारा - पवनी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित येत उपेक्षित असलेल्या पवनीच्या परकोट किल्ल्यावर दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर दिव्यांची होणारी आरास बघून आपल्याही गावातील किल्ल्याची आरास करावी, असे विद्यार्थ्यांना वाटत होते. त्यातूनच हा उपक्रम राबवण्या आला. तसेच गावातील कुंभार समाजास दिवाळीची मदत व्हावी, यासाठी त्यांच्याकडून 5,000 दिवे विकत घेऊन किल्ल्यावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
तब्बल 5 हजार दिव्यांनी किल्ला झाला प्रकाशमय -
किल्ल्यावर विजेची रोषणाई करणे खर्चिक आणि न परवडणारे काम होते. तसेच कोरोनामुळे कुंभार समाजाच्या लोकांवर मोठे आर्थिक संकटे ओढवले होते. एका चांगल्या उपक्रमातून दोन उद्देश साध्य करीत या विद्यार्थ्यांनी आपल्याच गावातील कुंभार समाजाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशातून त्यांच्याकडून मातीचे 5000 दिवे घेतले. यामुळे कुंभार समाजाची दिवाळी प्रकाशमय झाली.
दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी -
पहिल्यांदा झालेल्या दीपोत्सवमुळे या परकोट किल्ल्याचा कायापालट झाला. दिव्यांच्या प्रकाशात त्याला एक नवीन आणि आकर्षित करणारे रुप मिळाले. किल्ल्याचा हा नवीन रुप पाहण्यासाठी पवनीकरांनीही मोठी गर्दी केली होती. दिवाळीच्या निमित्ताने का होईना, या उपक्रमातून गावात असलेले सर्व विद्यार्थी एकत्र आले. गावातील कुंभारांना काम मिळाले. दुर्लक्षित असलेल्या किल्ल्याला त्याचे वैभव प्राप्त झाले. त्यामुळे गावात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या नवीन उपक्रमाची गावकऱ्यांनीही प्रशंसा केली आहे.
हेही वाचा - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वाईच्या कृष्णा घाटावर दीपोत्सव