भंडारा - जिल्ह्यात आज (दि. 14 जाने.) पहाटे 9 हजार 500 कोविशिल्ड लस प्राप्त झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून लसीकरणासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.
जिल्ह्यत तीन ठिकाणी दिली जाईल लस
शनिवार (16 जानेवारी) जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर व ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली आहे. याठिकाणी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष उभारण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी
आरोग्य सेवा देणाऱ्यांना हेल्थ केअर वर्कर याना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच कोविन अॅपवर अपलोड करण्यात आली आहे. जवळपास सात हजार लोकांची नोंदणी झाली आहे.
दोनवेळा टोचून घ्यावी लागणार लस
सीरम इन्स्टिट्यूट पुणे निर्मित कोविशिल्ड लसीचे 9 हजार 500 लस भंडारा जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. प्रत्येकी दोन याप्रमाणे 4 हजार 750 लाभार्थ्यांना ही लस स्नायूमध्ये शून्य पूर्णांच पाच मिलीलिटर द्यायची आहे. एका व्हायलमध्ये दहा लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरी लस घ्यायची आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोज घेतल्यानंतर पुढच्या 14 दिवसानंतर लस घेणाऱ्याच्या शरिरात अँटिबॉडी तयार व्हायला सुरुवात होईल. कोरोनाची लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.
पहिल्या दिवशी 300 लोकांना दिली जाईल लस
16 तारखेला शुभारंभाच्या दिवशी तीन केंद्रावर 300 लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व गुरुवारी नियमितपणे लसीकरण सुरू राहणार आहे. लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना टोकण देण्यात येणार आहे. त्यावर लसीकरणाची वेळ व दिनांक तर दुसऱ्या बाजूला संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक नमूद असणार आहेत. लसीकरण करून घरी आल्यावर काही त्रास झाल्यास नमूद क्रमांकावर संपर्क साधता येईल.
एक समन्वय समिती असणार
लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात एक समन्वय समितीही असणार आहे. त्यासोबतच कोविन अॅपवर माहिती भरण्यासाठी एक चमू असणार आहे. टप्प्या-टप्प्याने लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहेत. त्याचेही नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.
हेही वाचा - नागरिकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग का येते बाळा नांदगावकर यांचा शासनाला सवाल