भंडारा - स्प्रिंगडेल शाळेत २ दिवसीय विदर्भ प्रांत कार्यकर्त्यांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संस्कृत भाषेचे संवर्धन आणि प्रचार करण्यासाठी काम करत असलेल्या संस्कृत भारतीमार्फत २ व ३ फेब्रुवारी रोजी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या संमेलनाला उद्घाटक म्हणून आमदार रामचंद्र हसरे तर अध्यक्षस्थानी संस्कृत भारतीचे प्रांत उपाध्यक्ष श्रीनिवास वर्णेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुनील मुंडे आणि अखिल भारतीय संपर्कप्रमुख पंडित नंदकुमार, अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगावकर डॉ. नरेंद्र व्यवहारे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख पंडित नंदकुमार म्हणाले, की आज आम्ही विवेक गमावून बसलो आहोत. विदेशांमध्ये संस्कृत भाषेचे गोडवे गायले जातात. परंतु आमच्यासाठी संस्कृत पठण चर्चेचा विषय ठरतो. संस्कृत चर्चेचा नाहीतर देश कल्याणचा विषय ठरावा. त्यासाठी स्वतःचा वाटा म्हणून प्रचार-प्रसारासाठी कार्य करावे. कार्यकर्ता संमेलन कार्यकर्त्यांना परिवर्तनाची ऊर्जा देणारे असते.
प्रार्थनेला धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे, हा नक्कीच आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. विदेशात संस्कृत भाषेला डोक्यावर घेतले गेले आणि आम्ही संस्कृत बोलणार याकडे आश्चर्याने बघतो. संस्कृत ही एक भाषा नाही तर मार्गदर्शन आहे. आज आमच्या जिवंतपणी ही स्थिती आहे. त्यामुळे भारताला खरंच स्वातंत्र्य प्राप्त झाला आहे का हा प्रश्न पडत आहे. आज आम्ही विवेक गमावल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी कार्यकर्ता हिम्मत व धैर्यवान असावा. अशा कार्यकर्त्यांना घडविण्याचे काम कार्यकर्ता संमेलन करते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
संस्कृत भारतीचे कार्य ईश्वरीय आहे. संस्कृतच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे. हे संमेलन माझ्या मतदारसंघात होत असल्याचा आनंद आहे, असे मत यावेळी आमदार रामचंद्र अवसरे यांनी मांडले. तर संस्कृती जिवंत ठेवणारी संस्कृत भाषा आहे. तिच्या संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे, मत नगराध्यक्ष सुनील माने यांनी मांडले.
यावेळी संस्कृत क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या डॉ. शैलजा रानडे, वैशाली जोशी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, या संमेलनात संपूर्ण विदर्भ प्रांतातून २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. विविध सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मंथन करण्यात आले. तसेच विविध वस्तूंना संस्कृतमध्ये कोणकोणत्या नावाने ओळखले जाते याचे त्यासोबत संस्कृतमधील ग्रंथ आणि विविध लिखाण झालेल्या पुस्तकांचेही प्रदर्शन आणि विक्री यादरम्यान लावण्यात आली होती.