भंडारा - सरकार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार करत आहे. मात्र, साकोली येथे शिवभोजन केंद्राचा शुभारंभ करताना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनासंदर्भातील सूचना आणि लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी कुठलेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता तसेच तोंडाला मास्क न बांधता गर्दीमध्ये शिवभोजन केंद्राचा शुभारंभ केला. मात्र, ते विधानसभेचे अध्यक्ष असल्यामुळे आता यांना कोण समजवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या भंडारा येथे देखील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तरीसुद्धा राज्याचे विधानसभा अध्यक्ष अशी गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी साकोली येथील होमगार्ड परडे ग्राऊंडवरील सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीमध्ये शिवभोजन केंद्राचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या मागे गर्दी जमली होती. तसेच त्यांनी तोंडाला मास्क देखील बांधलेला नव्हता. ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई तरी कशी करावी? अशा द्विधा मनस्थितीमध्ये प्रशासन आहे.
नाना पटोले यांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद -
राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोन केंद्राच्या माध्यमातून सवलतीच्या दरात गरीब, गरजू आणि निराधार नागरिकांसाठी जेवणाची सोय व्हावी, या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन केंद्र उघडण्यात येत आहे. या शिवभोजनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तसेच त्यांनी या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत शासकीय अनुदान प्राप्त दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून साकोली येथील शिवभोजन केंद्रात प्रत्येक दिवशी 100 थाळीचे वाटप सध्या करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात मागणी वाढल्यास थाळीची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे संचालिका सरिता फुंडे यांनी सांगितले.