भंडारा - संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना वायरसने ८ दिवसापूर्वी महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. त्यानंतर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्र शासनाने याच्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून शाळा-कॉलेजेस, जिम, स्विमिंग पूल, नाट्यगृह, शॉपिंग मॉल हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. मात्र, हे आदेश रविवारी काढल्याने अनेक विद्यार्थी आज (सोमवार) शाळेत आले होते.
भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी 15 मार्चला जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस, स्विमिंग पूल, नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स 31 तारखेपर्यंत बंद राहतील अशा आदेश निर्गमित केले. मात्र, काल रविवार असल्याने आणि आदेश सायंकाळपर्यंत निघाल्याने ते बरेच शाळा कॉलेजपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे बऱ्याच शासकीय शाळेमध्ये शाळकरी विद्यार्थी सकाळी शाळेत पोहोचले होते. शाळेत पोहोचल्यानंतर 31 मार्चपर्यंत शाळा बंद असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितल्याने विद्यार्थी आल्यापावली परत गेले. बऱ्याच शाळांमध्ये पहिली ते नववी वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत. हे सर्व पेपर 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.
शासकीय शाळेतील विद्यार्थी जरी शाळेत पोहोचले असले तरी खाजगी शाळा अपडेट असल्याने या शाळेतील पालकांपर्यंत एसएमएसद्वारे शाळा बंद असल्याची माहिती पोहोचली आहे. त्यामुळे सीबीएससी शाळेत शिकणारे विद्यार्थी घरीच थांबले आहेत.