भंडारा - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ने प्रत्येक जिल्ह्यात संकल्प दिवस साजरा करून केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्याचे फर्मान काढले. भंडारा शहरातही हे आंदोलन केले गेले. पण प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या जिल्ह्यात हा संकल्प अवघ्या 30 मिनिटात आटोपला. विशेष म्हणजे हे आंदोलन करण्यासाठी जिल्हा काँग्रेस, काँग्रेस महिला आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले होते, त्यांची संख्याही 30 च्या घरात होती.
गांधी चौकात केले हे आंदोलन..
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितल्याप्रमाणे हा दिवस प्रत्येक जिल्ह्यात संकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश जिल्हा काँग्रेस कमिटीला प्रदेश कमिटी ने दिले होते. काँग्रेसच्या मुख्य कमेटीसह महिला आघाडी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अशा सर्वांनी मिळून केंद्र शासनाच्या, महागाई, इंधन वाढ, बेरोजगारी आणि या धोरणांचा निषेध करण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने भंडारा शहरातील गांधी चौकात हे आंदोलन झाले. या आंदोलनामध्ये काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला काँग्रेस च्या महिला एकत्रित आले.
केवळ 30 कार्यकर्त्यांनी 30 मिनिटांत आटोपला आंदोलन..
नाना पटोले ज्या जिल्ह्याचे नेतृत्व करतात अशा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दमदार आंदोलनाची अपेक्षा होती. मात्र तिन्ही आघाड्या मिळून केवळ 30 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत होते. जवळपास अर्धा तास निषेध करणाऱ्या घोषणा दिल्यानंतर हे आंदोलन गुंडाळून आंदोलनकर्ते आपापल्या घरी गेले.
स्वबळावर निवडणुकाचे स्वप्न पूर्ण होईल का..
ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लोकांमध्ये जाऊन भविष्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार बोलून दाखवितात. त्यासाठी विदर्भभर दौरेही करतात. त्या पक्षाचे आणि त्यांच्याच गृह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकार विरोधी असा निरुत्साह दाखवित असतील तर खरंच भाऊंचे स्वबळाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल का हा प्रश्नच आहे. नाहीतर प्रदेशातून आदेश आल्यानंतर, केवळ औपचारिकता म्हणून संकल्प आंदोलन एवढीच काही आंदोलनाची छाप पडेल.