भंडारा - जिल्ह्यातील वाळूला मुंबईपर्यंत मोठी मागणी आहे. त्यामुळे वाळू तस्करी नित्याचीच बाब झालेली आहे. मात्र, आता भंडारा जिल्ह्यात मुरूम चोरीमध्ये दुपटीने वाढ होत आहे. महसूल विभाग कारवाईच्या नावाखाली फक्त पंचनामे करीत आहे. मात्र, कुठलीही दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही.
जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांपासून राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत आहे. या महामार्गाच्या निर्मितीवेळी मोठ्या प्रमाणात भरावासाठी मुरमाची गरज पडते आणि यामुळेच मुरुमाच्या मागणीत तिपटीने वाढ झाली आहे. रस्ते निर्मिती करणारे कंत्राटदार यासाठी लोक नेमतात. मात्र, मुरुम आणण्याचे काम दिले जाणाऱ्या मुरुम तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत.
मुरुमाचे उत्खनन करण्यासाठी कमी जागेची परवानगी महसूल विभागातर्फे घेतली जाते. त्यानंतर वाजवीपेक्षा जास्त उत्खनन केले जाते. असाच एक प्रकार भंडारा तालुक्यातील उमरी या गावात आढळून आला आहे. उमरी गावातील जागेतून दोन टप्प्यात ४०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी महसूल विभागाकडून घेण्यात आली. मात्र, तिथून हजारो ब्रास मुरुमाची चोरी या मुरुम तस्करांनी केली आहे.
संबंधित प्रकाराबाबत महसूल विभागाला तक्रार केल्यानंतर महसूल विभाग कारवाईच्या नावाखाली फक्त पंचनामे करीत आहे. मात्र, कुठलीही दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सरळ महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याविषयी भंडारा तहसील विभागाच्या तहसीलदारांना विचारले असता, 110 ब्रास मुरुमाची चोरी झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि येणाऱ्या काळात या मुरुम चोरीवर आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.