भंडारा - मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेटाळा गावात वाळू माफियांनी पोलिसाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार असल्याचे समजते. दरम्यान मागील दीड वर्षात पोलिसांवर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या नदीवरील वाळूच्या घाटांचा लिलाव झाला नसल्याने घाट बंद आहेत. मात्र तरीही राजकीय वरदहस्त असलेले वाळू माफिया वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत आहेत. मोहाडी पोलीस स्टेशन मधील पोलीस बडवाईक हे बेटाळा गावाच्या दिशेने गस्त घालत होते. त्यांना वाळूने भरलेला ट्रक दिसला. तेव्हा त्यांनी ट्रकला थांबवून त्याची रॉयल्टी तपासणी केली असता रॉयल्टी नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे त्यांनी चालकाला ट्रक मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चल असे सांगितले. या कालावधीत ट्रक चालकाने वाळू माफियांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून पोलिसाला मारहाण केली.
बडवाईक यांनी घडलेला प्रकार मोहाडी पोलिसांना कळवला. तेव्हा इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. इतर पोलीसांना पाहताच वाळू माफिया आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून बडवाईक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तीन आरोपीपैकी ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर मुख्य आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान या आधीही मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रोहा गावात वाळू माफियांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला होता. यात पोलीस गंभीर जखमी झाले होते. ही घटना दुसऱ्यांदा घडल्याने वाळू माफियांवर मोहाडी पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.