भंडारा - गावातील दारूमुळे त्रस्त झालेल्या मोहोडी तालुक्यातील सालई खुर्द येथील महिलांनी एकत्र येत दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. विशेष ग्रामसभा घेऊन दोन महिन्यांपूर्वी दारूबंदीचा ठराव घेतला. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज सोमवारी महिलांनी गावात दवंडी देत रॅली काढली. महिलांचा हा दुर्गावतार पाहून दारुड्यांच्या आणि विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांच्या मदतीने दारूच्या अड्ड्यांवर धाड टाकत, या महिलांनी दारूचा साठा उद्धवस्त केला.
हेही वाचा... डीआयजी निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणातील मुलगी सापडली; आत्महत्येची चिठ्ठी लिहून झाली होती बेपत्ता
मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द या गावात काही वर्षांपासून दारूचा महापूर वाहत आहे. दारुड्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. तसेच या परिसरातील गुन्हेगारीही वाढली होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत सहेली ग्राम संघाच्या महिला एकत्रित आल्या. गावात कोणत्याही परिस्थितीत दारूबंदी करण्याचा विडा त्यांनी उचलला. यासाठी साले खुर्द ग्रामपंचायतीने सहकार्य केले.
हेही वाचा... निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंगने दाखल केला दयेचा अर्ज..
विशेष ग्रामसभा घेऊन 13 नोव्हेंबरला दारूबंदीसाठी ठराव घेण्यात आला. या ठरावाला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. 10 जानेवारीपासून गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात महिलांनी दारू विक्रेत्यांना दारूविक्रीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा विक्रेत्यांवर काहीही प्रभाव पडला नाही. शेवटी महिलांनी आंधळगाव पोलिसांची मदत घेत, गावात दारू विरोधी दवंडी देत रॅली काढली. तसेच पोलिसांच्या उपस्थितीत गावातील दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.
या रॅलीत सहेली ग्राम संघाच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आता दर आठवड्याला गावातून एकदा 'नशा मुक्त गाव' रॅली काढण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी महिलांच्या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले असून पोलिसांनीही सकारात्मक पावले उचलत महिलांचे आंदोलन यशस्वी करण्यात मदत केली आहे.