भंडारा - अखेर 70 भात गिरण्यांना भात भरडाईचे आदेश मिळाल्यामुळे गच्च भरलेली गोदामे खाली होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठपुराव्यामुळे भात गिरण्या पुन्हा सुरू होणार आहेत.
भंडारा जिल्ह्यात 71 आधारभूत खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झाले आहे. आतापर्यंत दहा लाख क्विंटलपेक्षा अधिक धान्य खरेदी झाले असून जिल्ह्यातील 116 भात गिरण्यासोबत करारनामे झाले आहेत. मात्र, जिल्हा पणन अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणाने मागील दोन महिन्यांपासून एकाही भात गिरणीला भरडाईचे आदेश दिले गेले नव्हते. त्यामुळे गोदामे तुडुंब भरले होते. अनेक धान खरेदी केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान हे केंद्रावर उघड्यावर पडून होते. त्यातच मागच्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे उघड्यावर असलेले धान पावसात भिजले आहे. हे धान खरेदी केंद्रांवर खरेदी केले जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झाले आहे.
याविषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करूनही निव्वळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संतापलेले अपक्ष आमदार भोंडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पणन अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकले होते. त्याच दिवशी नाना पटोले यांनी विविध खरेदी केंद्राची पाहणी करून धानाची उचल करण्याचे आदेश दिले. यामुळे आता 70 भात गिरण्या सुरू झाल्या आहेत.
"भरडाईच्या आदेशानंतर गोदामातील धान्याची उचल होईल त्यामुळे बंद पडलेली खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू होईल आणि शेतकऱ्यांचा धान उघड्यावर राहणार नाही. त्यामुळे अवकाळी पावसात नुकसान होणार नाही. मात्र, ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढच्या वर्षीपासून शासकीय गोदाम प्रत्येक ग्रामपातळीवर व्हावं यासाठी प्रयत्न करू." असे आमदार भोंडेकर यांनी सांगितले.