भंडारा - हवामान खात्याने 9 मार्च ते 12 मार्च या कालावधीत गारांसह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत आज रात्री भंडारा जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे किमान एक तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. धुलीवंदनाच्या दिवशी हा पाऊस बरसला. मात्र, तो रात्रीच्या सुमारास बरसल्याने नागरिकांना धुलीवंदनाचा आनंद लुटता आला नाही.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर मोठ्या उत्साहात धुलिवंदनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मात्र, रात्री 9 नंतर वादळ वारा सुरू झाला आणि काहीवेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. धूलीवंदन असल्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे नागरिकही कमी प्रमाणात घराबाहेर पडले होते. मात्र, जे नागरिक घराबाहेर होते त्यांची अचानक आलेल्या या पावसामुळे तारांबळ उडाली.
जवळपास अर्धा तास या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. या पावसामुळे पुन्हा एकदा गारवा निर्माण झाला. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात नेमके कोणत्या पिकाचे नुकसान झाले? याची माहिती मिळाली नसली तरी धान खरेदी केंद्रावर उघड्यावर ठेवण्यात आलेले धान ओले होण्याची शक्यता आहे. शेतात लावलेल्या भाजीपाला पिकाला सुद्धा या वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - होळीचा गोडवा कायम ठेवणाऱ्या 'गाठी' निर्मितीबाबत 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट