भंडारा - भारतीय हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच 1 ते 3 फेब्रुवारी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात गारठा वाढला असून दिवसभर थंड वारे वाहत असल्याने तापमानात कमालीची घट झाली आहे.
हवेचा वेग आणि हवेची दिशा बदलल्यामुळे बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणामामुळे मध्य भारतातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे विशेषतः पूर्व विदर्भात 1 ते 3 फेब्रुवारी या काळात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हेही वाचा - भोकरदन : शॉर्टसर्किटमुळे १५ क्विंंटल कापूस जळून खाक, शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी
गेल्या 2 महिन्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे किमान आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे भिजलेले धान खरेदी केले गेले नव्हते. तर आता परत एकदा पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धान खरेदी केंद्रांवरील धान आणखीही उघड्यावरच असल्याने धानाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - भंडारा शहरात पार पडला गणपतीचा आगळावेगळा लग्नसोहळा