भंडारा - तुमसर तालुक्यात एका संस्थापकाने त्याच्या शाळेतील मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्याध्यापकपदाचा राजीनामा देण्यासाठी संस्थाचालकाने थेट चाकूने हल्ला केला. मुख्याध्यापकाच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी संस्थचालकासह सहा जणांविरोधात आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवनारायण राणे (वय 56) असे जखमी मुख्याध्यापकाचे नाव असून त्यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाडीचा पाठलाग करून केला हल्ला
घटनेच्या दिवशी शालेय अनुदान मूल्यांकन माहिती देण्यासाठी राणे आपल्या चारचाकीने तुमसर येथे जाण्यासाठी निघाले. या गाडीत त्यांच्यासोबत मुलगा वैभव, पुतण्या सुधाकर व मित्र गुलाब पारधी हेही बसले होते. गाडी लोहारा टोलीजवळ पोहोचल्यावर दोन चारचाकी गाड्यांनी मुख्याध्यापकांच्या गाडीला थांबवण्यात आले. यानंतर त्यांना गाडीबाहेर काढून शिवीगाळ करत संस्थाचालक कन्हैयालाल बन्सीलाल टेंभरे (65 वर्ष) चंद्रसेन कन्हैयालाल टेंभरे (40 वर्ष), टेकचंद कन्हैयालाल टेंभरे (35 वर्ष), हेमंत कन्हैयालाल टेंभरे (29 वर्ष) यांसह देवीलाल चौधरी आणि एका अनोळखी व्यक्तीने शिवनारायण राणे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच चाकूने त्यांच्या हातावर वार केले. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या मुलावरही चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात मुख्याध्यापकांच्या हातावर, शरीरावर जखमा झाल्या आहेत. या मारहाणीत त्यांचा एक दातही पडला आणि त्यांच्या मुलाच्या हातावर देखील जखम झाली आहे.
संस्था चालकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
घटनेनंतर जखमी अवस्थेत मुख्याध्यापकांनी आंधळगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली आहे. आंधळगाव पोलिसांनी याप्रकरणी संस्थाचालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात निषेध व्यक्त होत आहे.
संस्थाचालकांनी आरोप फेटाळले
याविषयी संस्थाचालकास विचारल्यानंतर मुख्याध्यापकाने एका शिक्षिकेसोबत असभ्य व्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. यावरून हा वाद झाला, असे ते म्हणाले. तसेच मारहाण झाली नसून ही तक्रार खोटी असल्याचा दावा त्यांनी केलाय.