भंडारा - तालुक्यातील करचखेडा गावाजवळील निर्माणाधीन पूलावर अवैध वाळू वाहतूक करण्याऱ्या टिप्परच्या धडकेत दुचाकी वरील गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती यामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. मनीषा दिंगबर किरनापुरे (वय 27) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर घटनास्थळी गर्दी करत नागरिकांनी वाळूच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी लावून धरली आहे. अपघातामधील वाळू वाहतूक करणारा ट्रक भंडारा जिल्हा परिषदेच्या सदस्याचा असल्याची माहिती समोर आली आहे.
निर्माणाधीन पुलाजवळ अपघात-
भंडारा तालुक्यातील खडकी गावातील दिगंबर किरणापुरे हे पत्नीला घेऊन भंडारा शहराकडे जात होते. त्यांची पत्नी मनिषा या 6 महिन्याची गर्भवती होत्या. त्यामुळे नियमित तपासणी करण्यासाठी ते दुचाकीवरून भंडाराकडे जात होते. करडी मार्गावरील करचखेडा गावाजवळ मोठा पुलाची निर्मिती सुरू आहे. त्यामुळे एक छोटासा पर्यायी कच्चा रस्ता बनविला गेला आहे. हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने ट्रक किंवा टिप्पर या ठिकाणावरून गेल्यास इतर वाहनांना जाणे कठीण होते. याच कच्च्या रस्त्यावरून जात असताना समोरून वेगात आलेल्या ट्रकने त्याने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून पडून मनीषा किरणापुरे ही ट्रकच्या चाकाखाली आली, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर पती दुसऱ्या बाजूला पडल्याने तो सुदैवाने वाचला. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला.
जिल्ह्यात सध्या अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे या मध्ये राजकीय लोकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणत ही वाळू तस्करी सुरू आहे. ही अवैध वाळू तस्करी असल्याने वाळू घेऊन जाणारे ट्रक व ट्रेक्टर आपल्या बचावासाठी अतिशय वेगाने गाडी चालावत असतात, त्यामुळे नेहमी असे अपघात होतात. ट्रक मालक जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्यांचा निकटवर्तीय व स्वतः जिल्हा परिषद सदस्य असल्याने हे प्रकरण दाबले जाण्याची शक्यता आहे.