भंडारा - सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढत आहेत. शनिवारी ही यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. मात्र, या सभेनंतर संकुलातील क्रीडांगणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे क्रीडांगणावर सराव करणाऱ्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात २ आणि ३ ऑगस्टला झालेल्या पावसामुळे क्रीडांगणामध्ये ठिकठिकाणी पाणी साठले होते. त्यामुळे सभास्थळावर पोहचण्यासाठी वाळू आणि वादारीचा कच्चा रोड बनविण्यात आला. तसेच शामियानाच्या आतील चिखल झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैदानावर वाळू टाकण्यात आली. यामुळे मैदानाची दुर्दशा झाली होऊन खेळाडूंचा सराव थांबला आहे.
मैदान खराब झाल्याने, हॉकी, तायकांदो, धावणे आणि फुटबॉल या खेळाचा सराव पूर्णपणे थांबला आहे. शहरात दसरा मैदान, रेल्वे मैदान सारखे मोठे पर्याय उपलब्ध असताना हे क्रीडांगणच सभेसाठी का दिले, असा सवाल खेळाडू विचारत आहेत. यासाठी जबाबदार व्यक्तीवर कार्यवाही करण्याची मागणी देखील ते करत आहेत.
खेळाडूंचा क्रीडा अधिकाऱ्यांना सवाल
हे मैदान सभेसाठी दिले जात असताना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी खेळाडूंचा विचार करुन या गोष्टी वरिष्ठांच्या निर्देशास का आणल्या नाहीत, असा सवाल हे खेळाडू विचारत आहेत.