भंडारा : जिल्हाभरातून आलेल्या दोनशेहून अधिक खेळाडूंना स्पर्धे विना परत जावे लागल्याचा संताप जनक ( Anger players had to go back without tournament ) प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला आहे. विद्यार्थी मैदानात आल्यानंतर मैदानात असलेला गवत सफाईचा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सुरू केली होती. त्यामुळे एकही स्पर्धा न होता सर्व दोनशे विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा या नियोजन शून्य प्रकारामुळे क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे फजिती झाली.
खेळाडू आणि क्रीडा शिक्षक प्रचंड नाराज : जिल्हास्तरीय अंतर शालेय स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे घेतल्या जात आहेत. आज 24 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खरंतर ही स्पर्धा 18 नोव्हेंबर रोजी होणार होती. काही तांत्रिक कारणामुळे ती पुढे ढकलून आज 24 रोजी घेण्याचा निर्णय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यानुसार सर्व खातरजमा करूनच जिल्ह्यातील जवळपास दहा शाळांचे दोनशे विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून जिल्हा क्रीडा संकुल परिसरात स्पर्धेसाठी दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात संकुलात चित्र वेगळेच होते. ज्या हँडबॉल मैदानावर ही स्पर्धा होणार होती, तेथे मोठ्या प्रमाणावर गवत उगवले होते. मैदानाची कोणतीही आखणी त्या ठिकाणी केली गेली नव्हती. खेळाडू आल्यानंतर मजूर लावून गवत काढण्याचा कामाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत मैदानावरील गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धा होऊच शकल्या नाहीत. शेवटी क्रीडा विभागाच्या वतीने स्पर्धा होणार नाहीत, असे सांगून परत जाण्याचा सल्ला दिला. आलेले विद्यार्थी खेळाडू आणि त्यांचे क्रीडा शिक्षक प्रचंड नाराज झाले.
खेळाच्याबाबतीत ग्रामीण भागात उदासीनता : स्पर्धा आहे हे माहीत असतानाही आधीपासून मैदान का तयार करून ठेवण्यात आले नाही, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. हँडबॉल खेळाच्या मैदानाची झालेली ही दुरावस्था जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला का दिसली नाही. जर मैदान खेळण्याच्या योग्यतेचे नव्हते, तर शंभर ते दीडशे किलोमीटर अंतर कापून विद्यार्थ्यांना स्पर्धा असल्याचे सांगून का बोलविण्यात आले हा प्रश्न उपस्थित होतो. आधीच खेळाच्याबाबतीत ग्रामीण भागात उदासीनता असते. अशातच जिल्हास्तरावर खेळायला मिळेल या आशेने आणि उत्साहाने आलेल्या खेळाडूंना न खेळता परत जावे लागल्याने क्रीडा विभागाच्या खेळाबद्दल अनास्थेचे पुन्हा एकदा दर्शन झाले. जिल्हा स्थानी ही परिस्थिती असेल तर तालुका क्रीडा संकुलाची अवस्था काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. जिल्हा क्रीडा विभागाच्या अशाच धोरणामुळे जिल्ह्यात खेळा प्रतीची उदासीनता दिसून येत असून संबंधित विभागाचे हलगर्जीपणाचे धोरण या जबाबदार असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
क्रीडा विभागाची ही अनास्था खेळासाठी बाधक : ग्रामीण भागातून विद्यार्थी घेऊन आलेल्या सीता सावंगीच्या मॉडेल स्कूलच्या क्रीडा शिक्षिका रत्नमाला गायधने यांनीही झालेल्या प्रकारासंदर्भात संताप व्यक्त केला. क्रीडा विभागाची ही अनास्था खेळासाठी बाधक असल्याचे त्या म्हणाल्या. सनफ्लॅग स्कूलच्या वंदना शर्मा यांनी हा प्रकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्यासारखा असल्याचे सांगितले. शाळा आणि शिकवणी वर्ग यातून विद्यार्थांना वेळ मिळत नाही तरी आम्ही पालकांना विश्वासात घेवून खेळण्यासाठी मुले तयार करतो. मात्र या संताप जनक प्रकारानंतर जिल्ह्यातून खेळाडू तयार करण्याची मानसिकता जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आहे की नाही असा प्रश्न पडतो असे त्यांनी म्हटले. या प्रकारानंतर या दोन्ही क्रीडा शिक्षकांनी आणि हँडबॉल खेळाडू राहुल पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून घेत हा प्रकार पुन्हा होऊ नये असे सूचना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.