भंडारा - शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांचे तब्बल 52 कोटी रुपयांचे देयक थकवले आहे. विक्रीनंतर सात दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे, असा आदेश आहे. मात्र महिना उलटल्यानंतरही शेतकर्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण 67 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. यापैकी 66 केंद्रांवर 27 ऑक्टोबर पासून धान खरेदी सुरू झालेली आहे. आतापर्यंत 8076 शेतकऱ्यांकडून 2 लाख 90 हजार 612 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याची एकूण किंमत 52 कोटी 74 लाख 61 हजार 143 रुपये एवढी आहे. हे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाहीत.
याविषयी बोलताना आमदार राजू कारेमोरे म्हणाले, " मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत माझे बोलणे झाले आहे. महाराष्ट्रासाठी 67 कोटींची रक्कम बँकांकडे वळती करण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसै जमा होतील" असा विलंब इथुन पुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - 'आधारभूत किंमत खरेदी योजना' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 98 केंद्रांना मंजुरी
खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मागील तीन वर्षांपासून ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी यामध्ये नवनवीन बदल केले जातात. शासनाने सुरू केलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याविषयी जिल्हा मार्केटींग अधिकारी यांना विचारले असता, चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमले असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.