भंडारा - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला पवनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. त्याच्याकडून 34 देशी दारूचे बॉक्स जप्त केले असून त्याची किंमत 84 हजार रुपये आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर येथे दारूबंदी असल्याने भंडारा जिल्ह्यातील दारू तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरला येथील गावातील दोन आरोपी अवैध दारू व्यवसाय करतात. ते दारू छुप्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात पुरवठा करत आहेत, अशी गुप्त माहिती पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडे यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजबसिंग उत्तमसिंग दुधानी (वय 37) आणि सिकंदरसिंग दुधानी (वय 28) यांच्या सावरला येथील घरी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी त्यांच्या घरातून 34 देशी दारूने भरलेले बॉक्स मिळाले असून सुमारे 84 हजार रुपयांचा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अजबसिंग उत्तमसिंग दुधानी यांना अटक करण्यात आली असून सिकंदरसिंग दुधानी हा फरार आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या सीमा भागात दारू तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. मध्यप्रदेशातून दारू जिल्ह्याच्या सीमेतून विक्री करण्यासाठी नेताना आरोपी पकडले गेले आहेत. बऱ्याच वेळा पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील दारू तस्कर पकडले गेले. मात्र, या लोकांवर पूर्णपणे निर्बंध लावण्यात पोलीस यंत्रणेला अजूनही यश मिळाले नाही. तस्करी केली जाणारी दारूमध्ये भेसळ असते. त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतींच्या कारवाईची सतत गरज आहे.