भंडारा - जिल्ह्यातील आयसोलेशन वार्डमध्ये एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशाप्रकारे आयसोलेशन वॉर्डामध्ये आत्महत्या करण्याची जिल्ह्यातली ही पहिलीच घटना असून यामुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे.
तुमसर तालुक्यातील देव्हाडा ( बु. ) येथील 50 वर्षीय व्यक्तीला चार दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षण असल्याने आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, ही व्यक्ती दाखल झाल्यापासूनच तणावात होता, अशी माहीती समोर आली आहे. मात्र, तो कोरोनामुळे तणावात होता की कौटुंबीक किंवा इतर गोष्टींमुळे तणावात होता याची माहिती मिळू शकली नाही.
सोमवारी सकाळी कोरोना वार्डातील व्यक्ती बाथरूम गेले असता त्यांना सदर व्यक्ती हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून या कोरोनाग्रस्त व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. आतापर्यंत कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. मात्र, या व्यक्तीने आत्महत्या केली असल्याने पहिल्यांदाच शवविच्छेदन करण्यात येत आहे. तसेच रविवारी भंडारा तालुक्यातील एका 50 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 7 झाली आहे. मागील सात दिवसांपासून दररोज एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याने आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समोर येत आहे.