भंडारा - भात शेतीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे अजूनही 40 टक्के रोवण्या खोळंबल्या आहेत, तर ज्या शेतकऱ्यांच्या रोवण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या शेतात पाण्याअभावी मोठमोठ्या भेगा पडून पीक धोक्यात आले आहे. पुढच्या दहा दिवसात पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
भंडारा जिल्ह्यात 1 लाख 61 हजार 493 हेक्टर एवढे भात रोवणीचे क्षेत्र असून आतापर्यंत 1 लाख 6 हजार हेक्टरवर रोवण्या पूर्ण झाल्या आहेत. 60 टक्के रोवण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अजूनही 40 टक्के रोवण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. जोपर्यंत योग्य प्रमाणात पाऊस बरसणार नाही तोपर्यंत या रोवण्या पूर्ण होणे शक्य नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराज चौहान यांनी सांगितले. पुढच्या पाच-सहा दिवसात पाऊस येईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
भात पिकासाठी मुबलक पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्यात सुरुवातीला दमदार पाऊस बरसला. मात्र, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी घटली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 1 हजार 330 मिलीमीटर आहे. 1 जून ते 3 ऑगस्टपर्यंत सरासरी 678.7 मीमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, यावर्षी तीन ऑगस्टपर्यंत 516.5 म्हणजेच 76 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने कडक ऊन तापत आहेत. त्यामुळे उष्णता वाढून जमिनीला भेगा पडलेल्या आहेत.
ज्या शेतात रोवणी झाली आहे त्या शेतात आता मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे तेथील रोवलेले पीक खराब होण्याच्या परिस्थितीत आले आहे. शेतकऱ्यांनी रोवणी झाल्यानंतर मारलेले खत सुद्धा विरघळले नसल्याने शेतकऱ्यांचा खताचा पैसा वाया जाणार आहे. पुढच्या दहा दिवसात जर वरुणराजा बरसला नाही तर शेतकऱ्यांचा रोवणीचा आणि खताचा खर्च वाया जाऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येईल.
ज्या शेतकऱ्यांची रोवणी रखडली आहे त्यांची नर्सरीतील परे(भाताची रोपे) पिवळी पडत आहेत. ते शेतकरी हे परे जगवण्यासाठी धडपड करत आहेत. जर परे नष्ट झाले तर शेत पडीक ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती विविध प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची आहे. शेतीला पाण्याची गरज असतानाही कॅनॉलचे पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. एकीकडे कोरोनामुळे देशात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातच वरुणराजाने दगा दिल्याने शेतकरीही आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांचे पीक वाया गेले तर देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचेही पावसाकडे लक्ष लागून आहे.