भंडारा - आता भंडारा शहरातील कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी वनवन करावी लागत नाही, कारण ज्या रुग्णाला ऑक्सिजनची नितांत गरज आहे, अशा रुग्णाना आता भंडारा शहरातील 6 मित्रांनी तयार केलेला 'ऑक्सिजन मदत ग्रुप' द्वारे निशुल्क ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले जात आहे. भंडारा शहरातील ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या मालकाच्या अभिनव संकल्पनेतून हे शक्य झाले आहे.
हेही वाचा - भंडारा : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राबविला चार सूत्री कार्यक्रम
6 मित्रांनी एकत्रित येत सुरू केला मदत ग्रुप
कोरोना काळात बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडते, मात्र ऑक्सिजन बेड रुग्णालयात उपलब्ध नसतात तेव्हा या रुग्णांना घरीच उपचार घ्यावा लागतो. मात्र, ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था न झाल्यास रुग्णांचा जीव जातो. यावर उपाय म्हणजे 'ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर', मात्र ही मशीन प्रत्येकांना आर्थिक दृष्ट्या घेणे शक्य होत नाही किंवा बऱ्याच लोकांना इच्छा असूनही विकत मिळत नाही. म्हणून भंडारा शहरातील 6 तरुणांनी एकत्रित येत ऑक्सिजन मदत ग्रुपची स्थापना केली.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सहायाने घरपोच मदत
'ऑक्सिजन मदत ग्रुप' च्या माध्यमातून भंडारा शहरातील कोरोना रुग्ण ज्यांची ऑक्सिजन लेवल 94 ते 84 पर्यंत आहे अशा रुग्णाला ऑक्सिजनची गरज असल्याने त्यांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले जाते. भंडारा शहरातील ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअरचे मालक रोशन काटेखाये यांच्या संकल्पनेतून हा ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुपमधील इतर पांच मित्र संजय चौधरी, मनीष वंजारी, यश ठाकरे, शालिक अहिरकर, काटेखाये यांनी एका व्यक्तीकडून उपयोगात नसलेले 10 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर घेतले. त्याचबरोबर, 'ऑक्सिजन मदत ग्रुप' असा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करत गरजूंना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले.
निशुल्क सेवा
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर गरजवंत व्यक्तीच्या ठिकाणावर पोहचवून तिथे लावून देतो. स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करतात, एवढेच नाही तर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनासुद्धा होण्याची भीती असते, मात्र ही सेवा आहे आणि सेवा देतांना शुल्क घेतले जात नाही आणि म्हणून आम्ही कोणाकडून पैसे घेत नाही, असे या ग्रुपच्या लोकांनी सांगितले. या शिवाय काही लोक ओम साई स्वस्त सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअरमध्ये येऊन ही मशीन स्वतःही घेऊन जातात. लोकांचा जीव वाचविल्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदातून आम्हाला खऱ्या अर्थाने मानसिक समाधान मिळतो, जो इतर कुठेही मिळणार नाही, असे या उपक्रमात सहभागी असणाऱ्या तरुणांनी सांगितले.
नातेवाईकांनी मानले ग्रुपचे आभार
ऑक्सिजन मदत ग्रुपच्या मदतीने अनेक गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळाले असून अनेकांचे प्राण वाचले आहे. यामुळे नातेवाईकांची आपल्या रुग्णासांठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची धावपळ ही वाचली आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्राणही वाचले. त्यामुळे, रुग्णांच्या नातेवाईकांनी ग्रुपचे आभार मानले आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑक्सिजनची मागणी वाढत होती. अशा प्रसंगी सर्व जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर न टाकता आपले सामाजिक दायित्व समजून या तरुणांनी मदतीचे हात पुढे केले आहे. शहरात या मदत ग्रुपची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा - जागतिक परिचारिका दिवस - 15 वर्षांपासून ज्योती चौधरी करतात रूग्णसेवा