भंडारा - जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. शासनाच्या नियमांना डावलून येथे वृक्ष लागवड केली जात आहे. पाखन माती आणि शेणखत न घालताच येथे वृक्ष लागवड केली जात आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र शासन १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान राज्यभारात ३३ कोटी वृक्ष लागवड महोत्सव राबवित आहे. या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यात गालबोट लागले आहे. वनविभागाच्या नियमानुसार वृक्ष लागवड करत असताना ६० बाय ६० सेंटीमीटरचे खड्डे खोदून त्यामध्ये वृक्ष लागवड करायची आहे. मात्र, तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत २१ ठिकाणी वृक्षाची लागवड केली असून वनाधिकारी यांनी नियमांना डावलून कामे केली आहेत. वृक्ष लागवड करत असताना खड्ड्यात पाखन माती व शेणखत टाकून वृक्ष लागवड करायची आहे, पण तुमसर येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कुठलीही पाखन माती , शेणखत न घालता वृक्षांची लागवड केली आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत जवळपास १३ कोटी रुपये खर्च करून वृक्ष लागवड करीत असताना शासनाच्या नियमानुसार वृक्ष लागवड न करता त्यातील पैशांची बचत कशी होईल आणि ते आपल्या खिशात कसे जातील हाच विचार येथील अधिकारी करत आहेत. अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक मजुरांनी केली आहे.
या विषयावर जेव्हा अधिकाऱ्यांशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही हे कंत्राट दिले असून काही त्रुटी असतानासुद्धा नियमाने कामे केली जात आहेत. पण याच अधिकाऱ्याकडे कुठलेही बील नाही. तर त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी त्यांची पोल खोल करत आम्ही कुठल्याही खताचा वापर केलेला नाही, अशी कबुली दिली. यामुळे अधिकारी स्पष्ट खोटे बोलत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार यांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
या वृक्ष लागवड प्रकरणात गाळयुक्त माती टाकली असल्याचे सांगण्यात येत असून महसूल विभागाची कुठलीही रितसर टीपी घेतलेली नाही. उलट नियमांना डावलून सगळी कामे करणाऱ्या या अधिकाऱ्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.