भंडारा : कोरोनामुळे लोकांसमोर उभे झालेले आर्थिक संकट लक्षात घेता मदतीचे शकडो हात सध्या पुढे येत आहे. यात एक नाव आता भंडाऱ्यातील सावरी गावातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या वडीलांचे देखील आहे. मुख्याध्यापक उपदेश लाडे यांनी स्वतःजवळचे तब्बल एक लाख रुपये गरिबांची भूक भागवण्यासाठी दिले आहेत. या पैशातून त्यांनी गावातील गरजूंना मोफत रेशनचे धान्य उपलब्ध करुन दिले आहे.
हेही वाचा... धक्कादायक! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून
कोरोनाने राज्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून वाढत्या बेरोजगारीमुळे लोकांच्या हातात पैसे राहिले नाहीत. त्यामुळे सरकारने रेशन जरी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले असले, तरिही ते घेण्याइतके पैसे देखील लोकांकडे नाही. ही बाब लक्षात आल्याने सावरी येथील रहिवासी भीमराव लाडे यांनी लोकांना मदत करण्याची इच्छा आपल्या मुख्याध्यापक मुलगा उपदेश लाडे याकडे व्यक्त केली.
उपदेश लाडे यांनी देखील वडीलांचे विचार मानले. त्यानंतर 8 हजार लोकसंख्या असलेल्या सावरी गावातील 3 रेशन धान्य वाटप दुकानदारांना मे महिन्याचे रेशनचे पैसे स्वतः दिले. त्यात त्यांनी गरजूंकडून पैसे घेऊ नका, असे त्यांनी सांगितले. बीपीएल कार्ड धारकांचे 40 रुपये तर इतर कार्ड धारकांचे 60 रुपये, असे एकूण 2400 लाभार्थ्यांचे मे महिन्याचे पैसे त्यांनी संबधित रेशन दुकानदारांना देवू केले आहेत. राज्यात कोरोनामुळे सर्व स्तरावरून मदत उपलब्ध होत असली, तरिही सावरी येथील या पिता-पुत्राच्या मदतीची चर्चा साऱ्या जिल्हाभर होत आहे.