भंडारा - जिल्ह्यातील काही तालुक्यात ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर, वेगवेगळ्या ठिकाणी नववर्ष साजरा करण्यासाठी केलेल्या तयारीवर पावसाने पाणी फेरले. यामुळे वातावरणात गारव्याचे प्रमाण वाढले सोबतच आनंद साजरा करणाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
मंगळवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि वारे वाहत असल्यामुळे थंडीचा गारठा होता. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली आणि जवळपास १ ते दीड तास रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर असलेल्या लोकांची चांगलीच फजिती झाली. विशेष म्हणजे, ऑफिस सुटल्याने लगबगीने परत जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना ऑफिसबाहेर पाऊस जाण्याची वाट पाहत तात्कळत वाट पाहावी लागली.
हेही वाचा - भंडाऱ्यात 'या' ठिकाणी भरते नदीच्या मध्यभागी जत्रा
३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी काही मंडळी निसर्गरम्य ठिकाणी गेले. तर, बऱ्याच हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेलच्या मोकळ्या जागेवर जय्यत तयारी केली होती मात्र, पावसाने ती सर्व तयारी धुडकावून लावली. पावसामुळे थंडीचा पारा चांगलाच घसरला असल्याने सायंकाळी सेलिब्रेशनसाठी निघणाऱ्या नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. मागील काही दिवसांपासून पारा घसरला असल्याने थंडीमुळे लोकांच्या आरोग्याच्या तक्रारीतही वाढ होत आहे.
हेही वाचा - मंडळ कृषी अधिकारी कार्यालय बनले शोभेची वस्तू, कर्मचाऱ्यांची कमतरता