भंडारा : जिल्ह्यात आज(शुक्रवार) पुन्हा 6 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात भंडारा तालुक्यातील 1, तुमसर 1, लाखनी 2 व पवनी तालुक्यातील 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, आतापर्यंत 80 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 161 झाली असून 81 क्रियाशील रुग्ण आहेत.
शुक्रवारी आढळलेल्या 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात गुजरात येथून आलेला एक व्यक्ती, तुमसर तालुक्यात ठाणे येथून एक व्यक्ती, पवनी तालुक्यात औरंगाबादवरून एक व्यक्ती तसेच एक संशयित व्यक्ती आणि लाखणी येथील हाय रिक्स कॉन्टॅक्ट मधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 80 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यात आज 6 नव्या रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात आता 81 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर, आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 161 एवढी असून 90 अहवाल प्रतिक्षेत आहे.
आतापर्यंत 5 हजार 11 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 161 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 4 हजार 760 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच 90 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आज आयसोलेशन वार्डमध्ये 83 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 508 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर,लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी येथे 479 भरती आहेत. 3 हजार 930 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44 हजार 808 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 42 हजार 118 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 2 हजार 690 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.