भंडारा - जिल्ह्यात एकाच दिवशी (शुक्रवारी) तब्बल 49 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिक आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात साकोली तालुक्यातील 27, भंडारा तालुक्यातील 4, तुमसर तालुक्यातील 6, लाखनी तालुक्यातील 11 व पवनी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या रुग्णांपैकी 24 रुग्ण हे हायरिक्स कॉन्टॅक्टमधील आहेत. यामध्ये एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. एकूण रुग्णांची संख्या 155 झाली असून 79 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. सध्या 76 रुग्ण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पुणे येथून 3, नागपूर येथून 2, मध्यप्रदेशवरून 1, बंगळुरूवरून 3, गोवा येथून 1, उत्तर प्रदेशवरून 9, बिहार वरून 1, कोलकाता येथून 2, कुवेतवरून एक आणि हैदराबादवरून एक रुग्ण भंडारा जिल्ह्यात आले होते. तर या अगोदर बाहेरून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले हायरिक्स रुग्णांची संख्या तब्बल 24 आहे. आज मिळालेल्या रुग्णांमध्ये 9 महिन्याची गर्भवती महिला असून, पुढच्या आठवड्यात तिची प्रसुती होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तिची विशेष काळजी घेतलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 79 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी 49 नव्या रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात आता 76 कोरोना पॉझिटिव्ह उपचार घेत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 155 एवढी आहे तर 152 अहवालांची प्रतीक्षा आहे.
शुक्रवारी आयसोलेशन वार्डमध्ये 32 व्यक्ती भरती असून, आतापर्यंत 506 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखणी, भंडारा व मोहाडी येथे 449 व्यक्ती भरती आहेत. 3 हजार 878 व्यक्तींना क्वारंटाईन सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44 हजार 765 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून, 42 हजार 19 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 2 हजार 764 व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले असून त्यांनी घरांमध्येच रहावे बाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.