भंडारा - सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला. आता हा पूर ओसरतोय. मात्र पुरातून प्राण वाचलेल्या लोकांना जगण्यासाठी लागणारे अन्न, वस्त्र, निवारा, नसल्याने पुन्हा जीव वाचवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला आहे. काहींचे अन्नधान्य या पुरात वाहून गेले, तर कोणाचे घर पडले, कित्येकांचे व्यवसाय पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे या पूरग्रस्त लोकांचा जगण्यासाठीचा खरा संघर्ष आता सुरू होणार आहे.
1994 नंतर पहिल्यांदाच अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 76 गावांना पुराचा फटका बसला असून 18,192 लोक बाधित झाले आहेत.
मुख्य शहराला लागून असलेल्या कारधा गावातील निंबार्ते कुटुंबावर वेगळेच संकट ओढवले आहे. निंबार्ते यांची कन्येचा विवाह पुढच्या महिन्यात आहे. त्यासाठी तिच्या मोठ्या भावाने कष्टाने पैसे वाजवले होते. तो गवंडीकाम करतो. घरात गहू, तांदूळ घेऊन ठेवले होते. मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे सगळंच या पुरात वाहून गेलंय. आता लग्न कस करावं, असा प्रश्न या कुटुंबासमोर समोर आहे.
पुरामुळे जिल्ह्यातील तब्बल 18, 192 कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. बऱ्याच लोकांचे किराणा व्यापार, कापडाचा व्यापार, अन्न धान्याच्या व्यापार या पुराच्या पाण्यात बुडाला आहे. शेकडो लोकांची घरं पडली आहेत. न राहायला घर, न खायला अन्न, नाही अंगावर घालण्यासाठी कापडे त्यांच्याकडे उरले आहेत. त्यामुळे या पुरातून वाचल्याचा आनंद साजरा करावा, की सर्वच गमावल्याचा दुखवटा, हे या लोकांना कळत नाही. जगावं की मरावं या विवंचनेत असलेल्या लोकांना मायबाप सरकारने आधार द्यावा अशी मागणी पूरग्रस्त करत आहे.