भंडारा - जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या नवनिर्मितचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, या कामात अनियमितता आढळून आल्याने हे काम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या महामार्गाची निर्मिती करत असताना त्याच्या रुंदीकरणामध्ये अनियमितता दिसून येत आहे.
२२ मीटर रुंदीपासून सुरुवात करण्यात आलेल्या या रस्त्याची रुंदी शहरातील गांधी चौकात ५ मीटर इतकीच असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधींकडे तक्रार दाखल केली आहे.
शहरातील जिल्हा परिषदपासून ते मनसरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.मात्र, हे काम सतत वादात सापडत आहे. हा महामार्ग संबंधीत अधिकारी आणि कंत्राटदार आपल्या सोयीनुसार मिळेल तेवढ्या जागेत रुंदीकरण करून घेत आहेत.
महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्याच्या एका बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या बाजुचे अतिक्रमण काढण्यात आले नाही. याबाबत विचारणा करण्यात आली असता, त्या बाजूचे काम सुरू झाल्यास त्या बाजूचे अतिक्रमण सुद्धा काढू, असे अधिकारी सांगत आहेत. प्रत्यक्षात दुसऱ्या बाजूला दोन वकिलांची घरे आहेत. कायद्याची भाषा वापरून ते या कामात अडथळा आणत असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्हा परिषद चौकातून २२ मीटरच्या रस्त्याची निर्मिती सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ही रुंदी कमी होऊन २० मीटर तर कुठे १८, १६ मीटर झाली. राजीव गांधी चौकाच्या जवळ ५-५मीटर चे म्हणजे १० मीटरच्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅक आणि मोठे वाहन धावणार आहेत. अशा वेळेस एका बाजूच्या ५ मीटरच्या रस्त्यामुळे किती अपघात होतील, याचे भान या अधिकाऱ्यांना आहे का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार सुनील मेंढे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर या विषयावर बावनकुळे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीत रस्त्याची रुंदी वाढवू अशी ग्वाही अधिकारी आणि कंत्राटदाराने दिली आहे.