भंडारा - राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने एकरी 15 हजार नुकसानभरपाई काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. तसेच धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल अशा पद्धतीचा काढलेला जीआर मागे घ्यावा अशी मागणी देखील पटोले यांनी केली.
साकोली विधानसभेतून पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नाना पटोले हे बुधवारी भंडाराच्या प्रसारमाध्यमांशी बोलत होते. इकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तर, दुसरीकडे भाजप आणि शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी खुर्चीची रस्सीखेच करीत आहेत. पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले धान पाण्यात सापडल्यामुळे त्याला कोंब फुटायला लागली आहेत. मात्र कार्यवाहू मुख्यमंत्री मुद्दाम शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यात ४ दिवसानंतर मंगळवारी त्यांनी सर्वे करण्याचा आदेश दिले होते.
हेही वाचा - लाखांदूर तालुक्यात परतीच्या पावसाचा धान पिकांना फटका
पावसानंतर शेतकरी त्यांचे धान त्या पाण्यातच सोडून देतील, बहुतेक अशी कल्पना या मुख्यमंत्र्याची असावी. त्यामुळे या सर्वांच्या भानगडीत न पडता मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. शेतात झालेल्या नुकसानाची त्यांना एकरी १५ हजार नुकसानभरपाई द्यावी. तसेच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे अशी मागणी यावेळेस पटोले यांनी केली. तर, सत्तेसाठी भांडण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या अन्यथा त्याचा जाब शेतकरी आणि आम्ही तुम्हाला विचारू असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
तसेच शासनाने नुकताच एक जीआर काढलेला आहे. या जीआरनुसार धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. खरंतर शेतकऱ्यांची एकच जात असते ती म्हणजे शेतकरी. मात्र, या भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांच्या जाती-जामातींमध्ये विभाजन करून, शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम हे शासन करीत आहे. सरकारने केलेली ही चूक तातडीने सुधारावी आणि काढलेला जीआर मागे घ्यावा असे पाटोले यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - भंडारा-गोंदिया भाजप मुक्त; लोकसभेत दोन लाखांचे मताधिक्य तर विधानसभेत दारुण पराभव