भंडारा - नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडली. त्यानंतर ९ महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे. ९ महिन्यांपूर्वी खोदून ठेवलेला खड्डा बुजवण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देत पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे.
भंडारा शहरातील राधाकृष्ण विहार कॉलनीत मुख्य रस्त्यावर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ९ महिने अगोदर भला मोठा खड्डा करून ठेवला होता. ज्यामुळे येथील रहिवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे बरेचदा अपघातही घडले. याविषयी नगरपालिका कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी प्रत्येक वेळेस उडवाउडवीचे उत्तर दिली. या विभागातील तिनही नगरसेवकांना नागरिकांनी आपल्या समस्येची जाणीव करून दिली. मात्र, याची दखल कोणी घेतली नाही. शेवटी परिसरातील महिला आणि पुरुषांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येऊन अडचणींचा पाढा वाचला. एवढेच नाही, तर या ९ महिन्यापासून पाईपलाईन बंद असल्याने पाण्याची अडचण असल्याचे सांगितले.
नागरिकांनी समस्या मांडताच मुख्याधिकार्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कक्षात बोलावून या दिरंगाईविषयी विचारले. त्यांनी त्वरित समाधान करण्याचे उत्तर दिले. मात्र, लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. नऊ महिन्यापासून खड्डा करून ठेवला, तुम्हाला पाईप लाईनमध्ये लिकेज शोधण्यासाठी ९ महिने का लागतात, असा प्रश्न केला. या प्रश्नांवर मात्र पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मूग गिळून होते.
हा खड्डा त्या परिसरात गेलेल्या नळाच्या पाईपलाईनमधून माती शिरल्यामुळे पाणी पोहोचत नसल्याचे कारण सांगत खोदला गेला. मात्र नऊ महिन्यात पालिकांच्या या कर्मचाऱ्यांना माती नेमकी कुठून येत आहे, हे ठिकाण शोधता आले नाही. त्यातच आता उन्हाळा असल्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली. त्यामुळे नागरिकांनी परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. नगरपालिकेमार्फत एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र ५०० लोकवस्तीच्या या परिसरात एकापेक्षा जास्त टँकरची गरज आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेत लोकांच्या समस्यांचा लवकरात लवकर निपटारा करुन त्यांच्या गरजेनुसार पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.