भंडारा - कंत्राटदाराला मिळालेल्या धमकीनंतर भंडारा-पवनी राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १५ दिवसांपासून बंद होते. 'ईटीव्ही'ने ही बातमी उचलून धरताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गुरुवारी कोंढा-कोसरा गावात 'रास्ता रोको आंदोलन' केले. काही लोकप्रतिनिधी रस्त्याचे कंत्राट मिळवून घेण्यासाठी कंत्राटदाराला धमकी देत असल्याचा आरोप या वेळी आमदारांनी केला. तसेच 5 डिसेंबरपर्यंत काम सुरळीत न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कोंढा-कोसरा येथे आमदार भोंडेकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आणि सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर गावकरी आणि कार्यकर्त्यांनी मिळून ग्रामपंचायतीसमोर रस्ता रोको आंदोलन केले. काही काळानंतर येत्या 5 तारखेपर्यंतची मुदत देत हे आंदोलन थांबविण्यात आले. मात्र, ५ नंतर रस्त्यांची सर्व कामे सुरळीत न केल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा - साकोली बँक ऑफ इंडियामध्ये चोरी करणारा चोरटा जेरबंद; १ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
कंत्राटदाराला धमकी दिली म्हणून त्यांनी काम बंद केले, याविषयी विचारले असता आमदार भोंडेकर म्हणाले, काही लोकप्रतिनिधी हे या रस्त्याचे काम मिळवू पाहत आहेत. त्यामुळे ते कंत्राटदाराला धमकावून काम बंद पाडतात, जेणेकरून हे कंत्राट त्यांना मिळेल. त्या लोकप्रतिनिधींनी वाट्टेल ते करावं मात्र, नागरिकांना जर त्रास होत असेल तर आम्ही त्याचा विरोध करू. तसेच काही राजकीय विरोधी लोक हे काम आम्ही बंद केले असल्याची अफवा पसरवत आहेत, त्याचाही विरोध करायला आम्ही इथे आलो आहोत. हे काम केंद्राचे असल्याने आमचा काहीही हस्तक्षेप नाही, हे आम्ही लोकांना आणि आमच्या विरोधकांनी सांगू इच्छितो.
हेही वाचा - जीवंतपणी झाले वेगळे मृत्यूनंतर आले एकत्र; भंडाऱ्यात पत्नीच्या मृत्यू नंतर पतीचाही मृत्यू
हे काम सुरू झाले तेव्हापासून लोकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. सर्विस रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बरेच अपघात होऊन लोकांचे जीव पण गेलेले आहेत. मात्र, एवढे होऊनही या कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. या कंत्राटदाराला योग्य ती कारवाई करून त्याला काळ्या यादीत घालावे, अशी मागणी यावेळी आमदारांनी केली. कंत्राटदार जर योग्य पद्धतीने आणि लोकांना त्रास होणार नाही, असे काम करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी राहू. त्याला कोणीही धमकी दिली तरी त्याला घाबरण्याचे कारण नाही, असे आमदार भोंडेकर म्हणाले. तसेच आजचं आंदोलन हा केवळ एक ट्रेलर होता. मात्र, यानंतरही हे काम सुरळीत सुरू झाले नाही तर एक मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा आमदार भोंडेकर यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - भंडाऱ्यात परतीच्या पावसाने 9 हजार हेक्टर शेतीचे नुकसान