भंडारा - लॉकडाऊनच्या काळात निवडक नागरिक कामानिमित्त किंवा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे अपघात कमी झाले असले तरी भंडाऱ्यामध्ये एका तरुणाचा टिप्परच्या मागच्या चाकात आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक न करता नियम पाळत साईड मिळण्याची वाट पाहत उभे राहणे त्याच्या जीवावर बेतले. सतीश बाभरे (35, वर्ष राहणार आमगाव/दिघोरी) हा पेट्रोल पंपावर कामावर होता. गुरुवारी आपल्या दुचाकी (एमएच-36 एम- 8230) ने कामावर निघाला होता.
राष्ट्रीय महामार्गाला लागून कच्चा रस्ता बनविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी मुरूम घेऊन टिप्पर (क्र. एमएच-40- वाय - 8477) हा रस्त्याच्या कडेला दुसऱ्या टिप्परच्या निघण्याची वाट पाहत उभा होता. सतीशनेही त्या टिप्परच्या मागे आपली गाडी उभी केली. दुसरा टिप्पर निघताच उभा असलेल्या टिप्पर चालकाने टिप्पर पुढे नेण्याऐवजी मागे नेला आणि साईड मिळण्याची वाट पाहत मागे उभा असलेल्या सतीच्या गाडीवर टिप्पर चढला. त्यामुळे सतीश गाडीसह टिप्परच्या चाकाखाली दाबला गेला.
सतीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले आहे.